वळण येथील प्रयोगशील शेतकर्‍याने लावली जांभळाची बाग परिसरात ठरतोय कुतुहलाचा विषय; शेतकरी भेटी देवून करताहेत कौतुक


नायक वृत्तसेवा, राहुरी
आंबा, पेरु, डाळिंब आदी फळबागा लावणारे शेतकरी आपण पाहतो. परंतु वर्षातील एक-दोन महिन्यांचा हंगाम असलेल्या जांभळाची बाग लावण्याचे धाडस वळणच्या (ता.राहुरी) एका शेतकर्‍याने दाखवले असून ही फळबाग परिसरात कुतुहलाचा विषय ठरली आहे.

राहुरी तालुक्यातील वळण येथील प्रगतिशील शेतकरी गणेश अशोक राजदेव यांनी आपल्या शेतात एक एकर क्षेत्रावर बारडोली वाणाची जांभळाची झाडे लावली आहेत. जांभूळ पीक आयुर्वेदिक असून मधुमेहासाठी (डायबिटीस) जांभळे सर्वोत्तम असतात. जांभळाच्या बियापासून डायबिटीससाठी अनेक औषधी तयार करून औषध दुकानांमधून विकली जातात, त्यामुळे जांभळाला चांगल्यापैकी भाव मिळतो.

या जांभूळ बागेविषयी माहिती देताना गणेश राजदेव म्हणाले, मी तीन वर्षांपूर्वी जांभळीचे तीनशे रोपे प्रतिनग 65 रुपये प्रमाणे वाकडी येथून आणली होती. शेतामध्ये खड्डे घेऊन त्याच्यामध्ये शेणखत टाकले. त्यामध्ये एक-एक जांभूळ रोप लावले, अशी एकूण 300 झाडे लावली आहेत. पहिल्या वर्षी बागेत आंतरपीक म्हणून कांदा लागवड केली. कांद्याचे उत्पन्न देखील चांगल्यापैकी मिळाले. दुसर्‍या वर्षी कपाशी लावली होती. कपाशीचे देखील चांगल्यापैकी उत्पादन मिळाले. कापसाला भावही चांगल्यापैकी मिळाला.
चालू वर्षी बागेत गव्हाचे पीक घेतले असून गहू पीक देखील चांगले आले आहे. तीन वर्षात बागेत घेतलेली सर्वच आंतरपिके यशस्वी ठरलेली आहेत. शेतीकामात वडील अशोक राजदेव, आई मंदाबाई राजदेव यांचे तसेच आमचे मोठे बंधू अनिल यांचे मार्गदर्शन लाभते. तर शेतामध्ये पत्नी मनीषा, मुलगा यूवराज, मुलगी वर्षा हे देखील मदत करत असल्याचे गणेश राजदेव म्हणाले. दरम्यान, राजदेव यांच्या जांभूळ बागेस अशोक खुळे, बाबासाहेब खुळे, बाबासाहेब कारले, मुकिंदा काळे, राजेंद्र काळे, संतोष काळे, संजय शेळके, जगन्नाथ खुळे, अशोक शेळके, रघुनाथ आढाव आदी शेतकर्‍यांनी भेटी देवून शेतीतील या नवीन प्रयोगाचे कौतुक केले आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 115347

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *