‘अनलॉक’नंतर लागलीच संगमनेरात गुटखा तस्करावर छापा! अन्न व भेसळ विभागाची कारवाई; सव्वा लाख रुपयांचा गुटखा हस्तगत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड निर्बंध हटताच अवैध व्यावसायिकांची वळवळ सुरु झाली असून त्याची झलक आज संगमनेरात पहायला मिळाली. अहमदनगरच्या अन्न व भेसळ प्रशासनाने आज भल्या सकाळी शहरातील पद्मनगर येथे घातलेल्या छाप्यात सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा दहा गोण्या गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. या प्रकरणी संगमनेरातील गुटखा तस्कर नरसय्या पगडाल याला ताब्यात घेण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या वृत्ताने संगमनेरात अन्य अवैध व्यवसायांसह गुटखाही ‘तेजीत’ असल्याच्या वृत्ताला बळ मिळाले असून शहरातील अन्य गुटखा तस्कर ‘सावध’ झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील अन्न व भेसळ प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांच्या पथकाने शहराच्या उत्तरेकडील पद्मनगर परिसरात राहणार्या नरसय्या पगडाल याच्या दुकानावर छापा घातला. यावेळी वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये हिरा कंपनीसह अन्य गुटखा आणि त्यात वापरल्या जाणार्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा पथकाच्या हाती लागला. तो सगळा माल जप्त करुन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून गुटख्याचा साठा करणार्या पगडाल यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात गुटख्यावरुन मोठे ‘कांड’ घडले होते. श्रीरामपूरात सापडलेल्या गुटख्याचा तपास करतांना त्याची व्याप्ती जिल्ह्याभर पसरलेली असल्याची माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला त्यानुसार तपासाची सूत्रेही गेली, मात्र गुटखा म्हणजे लाखों रुपये मिळवून देणारे साधन असल्याने नंतरच्या तपासात बनवाबनवी होवू लागल्याने श्रीरामपूरच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांना ‘त्या’ प्रकरणातून बाजूला करीत शिर्डीच्या पोलीस उपअधीक्षकांकडे तपास सोपविण्यात आला होता. त्यांच्या तपासातून संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील संतोष डेंगळे या गुटखा माफीयाचे नाव समोर आले. मात्र तो अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही.
या दरम्यान तपास पथकाला या गुटख्याचे संपूर्ण अर्थकारण लक्षात आले. त्यातून हिरा कंपनीचा मालकच या तस्करीत अग्रणी असल्याचे व पुण्यातील अन्य एकजण कर्नाटकातील निपाणीहून गुटखा घेवून महाराष्ट्रात सर्वत्र गुटख्याचे वितरण करीत असल्याचेही तपासातून समोर आले. एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील हिरा गुटख्याचा व्यापार लक्षात घेता राज्यातील दैनिक उलाढाल किती मोठी असेल याचे अंदाजही त्यावेळी वर्तविले गेले आणि शेवटी ‘तो’ तपासही गुटख्याच्या पुडीप्रमाणे हवेत उडविला गेला. त्यामुळे इतकी मोठी कारवाई होवूनही आणि त्यातून थेट गुटख्याच्या उत्पादनापर्यंत पोलीस पोहोचूनही शेवटपर्यंत त्याचा तपास न पोहोचल्याने जिल्ह्यातील गुटखा तस्करीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
मात्र कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील व्यवसायांना निर्बंध असल्याने गेल्या मोठ्या कालावधीपासून जिल्ह्यातील पान स्टॉल बंद होते. त्यामुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करीच्या चर्चा थांबल्या होत्या. आता निर्बंध हटवून जेमतेम दहा/बारा दिवस उलटताच संगमनेरात गुटख्यावरील पहिली कारवाई झाल्याने श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईनंतर अडगळीत गेलेला गुटख्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे पद्मनगरसारख्या गजबजलेल्या भरवस्तीत इतका मोठा साठा असूनही पोलिसांना त्याबाबत माहिती नसल्याने पोलिसांची भूमिकाही ‘संशयात’ आली आहे.