जून महिन्याच्या शेवटीही पठार भाग तहानलेलाच! संगमनेर पंचायत समितीमार्फत 9 गावांसह 28 वाड्यांना होतोय टँकरद्वारे पाणी पुरवठा

नायक वृत्तसेवा, घारगाव
प्रवरा, म्हाळुंगी, आढळा व मुळा नदीचे वरदान लाभलेला संगमनेर तालुका पावसाळ्यातही तहानलेलाच असल्याचे चित्र दिसत आहे. देवकौठे ते बोटा अशा 171 गावांत विस्तीर्ण असलेल्या तालुक्यासह पठारभागात पावसाळा सुरू झाला तरी अद्याापही नऊ गावे व अठ्ठावीस वाड्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.

वैभवशाली तालुका म्हणून संगमनेरची अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात ओळख आहे. समृद्ध बाजारपेठ, सहकार, शैक्षणिक संकुल, शेती, आरोग्य सेवा, सांस्कृतिक अशा विविध घटकांचा भरणा असलेला संगमनेर तालुका दूरवर पसरलेला आहे. प्रवरा, म्हाळुंगी, आढळा व मुळा नदीचे सान्निध्य असलेल्या तालुक्यात छोटी-मोठी जलाशये देखील आहेत. तरी देखील जून महिन्याच्या शेवटी पावसाळा सुरू होवूनही टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे. 16 हजार 339 लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील वरवंडी, गुंजाळवाडी पठार, सावरगाव घुले, पोखरी बाळेश्वर, पिंपळगाव देपा, डोळासणे, वनकुटे, दरेवाडी, सायखिंडी, कर्जुले पठार आदी गावांसह अठ्ठावीस वाड्यांना दररोज पंचायत समितीच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सरासरी 33 खेपा होत असून, त्यासाठी एक विहीर, बोअरवेल, एक खासगी विहीर अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.

निसर्गाची देण लाभलेल्या पठारभागात दरवर्षी धोऽ धोऽ पाऊस पडतो. परंतु, निचर्याची आणि साठवण क्षमता नसल्याने पाणी वाहून जाते. यामुळे उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. बाया-बापडे सुमारे दोन-तीन किलोमीटरवरुन पिण्याचे पाणी वाहून आणतात. मात्र, स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही सरकार व प्रशासनाचे या संवेदनशील बाबीकडे लक्ष जात नसल्याचे वास्तव आहे. ऐन पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने मायबाप सरकारने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढावा असा सूर नागरिकांतून उमटत आहे.

