संगमनेरातील घाटांच्या संरक्षणासाठी नदीपात्रातच ‘लोटांगण’! पर्यावरण प्रेमींचे प्रवरा नदीपात्रात अनोखे आंदोलन; वाळू उपसा थांबविण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्राचीन आणि ऐतिहासिक किनार लाभलेल्या संगमनेरच्या प्रवरा नदीचे वाळूतस्करांकडून किनारेच कोरले जात आहेत. त्यामुळे या परिसरात असलेले विविध प्राचिन घाट आणि त्यालगत असलेल्या मंदिरांचे अस्तित्त्वच धोक्यात आले आहे. त्यातच शहरालगतच्या नदीपात्रात अबालवृद्ध पोहण्यासाठी येत असल्याने वाळूतस्करीतून झालेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे मानवासह पर्यावरणाचा जीवही धोक्यात आला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही घाटांच्या परिसरातील वाळू उपसा थांबत नसल्याने संगमनेरातील पर्यावरण प्रेमींनी आज सकाळी प्रवरा नदीपात्रात ‘लोटांगण’ घालून अनोखे आंदोलन केले. या उपरांतही या परिसरातून होणारा वाळू उपसा थांबला नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

गेल्या दोन दशकांपासून संगमनेर शहरालगतच्या प्रवरा नदीपात्रातून ट्रॅक्टर, बैलगाड्या, रिक्षा व अन्य खासगी वाहनातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. याबाबत गंगामाई परिसरात येणार्‍या संगमनेरकरांसह पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्‍या वृक्ष परिवार या संस्थेने वेळोवेळी निवेदने देवून या भागातील वाळु उपसा थांबविण्याची मागणी केली. मात्र आजवर त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे वाळू तस्करांनी आता प्रवरा नदीपात्रालगतचे घाट कोरायला सुरुवात केली असून त्यातून अनेक घाटांचे अस्तित्त्वच धोक्यात आले आहे. प्रचंड वाळू उपशामुळे घाटाच्या खालच्या बाजूला मोठमोठ्या कपारी निर्माण झाल्याने काही घाट कोसळलेही आहेत. काही वर्षांपूर्वी पालिकेने लाखो रुपये खर्च करुन या परिसराचे सुशोभीकरण केले होते, मात्र घाटांचे सौंदर्यच हरपल्याने हा सर्व खर्च वाया गेला आहे.

संगमनेरच्या नदीपात्रात आणि त्यातही गंगामाई घाटाच्या परिसरात संगमनेरातील अबालवृद्ध पोहोण्यासाठी येतात. गणेश विसर्जनाच्या दिनी तर अनेकजण आपल्या कुटुंबासह येवून श्रींचे विसर्जन करतात, त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश असल्याने यापूर्वी अनेक दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. वाळूतस्करांनी संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी नदीपात्रातील पालिकेची पाईपलाईनही उखडून टाकली आहे, मात्र तरीही येथील वाळूतस्करांना अटकाव केला जात नसल्याने गंगामाई परिसरात फिरण्यासाठी येणार्‍यांनी आज आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनात पर्यावरणासाठी काम करणार्‍या व गंगामाई परिसरातील वाळू उपसा थांबविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करणार्‍या वृक्ष परिवारानेही सहभाग नोंदविला.

मंथनातून निघालेल्या अमृताचे वाटप सुरु असताना राऊ नावाच्या राक्षणाने देवांचा वेश परिधान करुन अमृत मिळविले व ते प्राशन केले. ही गोष्ट चंद्रदेवाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नारायणाला सांगितले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने राऊचे शीर उडवले आणि आपल्या पायाच्या अंगठ्याने त्याच्या धडावरील कंठ दाबून त्याने प्राशन केलेले अमृत बाहेर काढले, ते अमृत प्रवरेच्या पात्रातून वाहिल्याने रतनगडावरुन उगम पावणारी प्रवरा अमृतवाहिनी बनली. मत्स्यपुराणात या गोष्टींचा उल्लेख आढळतो. त्यामुळे अमृतवाहिनी प्रवरेला प्राचीन काळापासून खुप मोठा इतिहास लाभला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीही येथील नदीच्या काठावर काही घाटांची निर्मिती केली आहे. मात्र वाळूतस्करांच्या हव्यासापायी अशा अनेक घाटांच्या अस्तित्त्वालाच आता घरघर लागल्याचे दिसत आहे.

या परिसरात दिवस-रात्र सुरु असणारा अवैध वाळू उपसा थांबवावा व अतिशय प्राचिन आणि पौराणिक महत्त्व प्राप्त झालेल्या या नदीच्या आणि त्याकाठी असलेल्या घाटांचे जतन व्हावे यासाठी गंगामाई परिसरात येणार्‍या नागरिकांसह संगमनेरकरांनी आज (ता.16) सकाळी नदीपात्रातच ‘लोटांगण’ आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनात अनेक संगमनेरकर सहभागी झाले होते. या सर्वांनी येथील वाळू उपसा त्वरीत बंद करुन पर्यावरणाची हानी रोखावी अशी मागणी केली.


गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आम्ही शहरालगतच्या नदीपात्रातून होणारा वाळू उपसा थांबविण्याची मागणी करीत आहोत. दिवस-रात्र सुरु असलेल्या या उपशामुळे या परिसरातील नदीपात्राची खोली प्रचंड वाढली आहे. उन्हाळ्यात व गणपती विसर्जनासाठी या परिसरातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने येतात, त्यातून यापूर्वी अनेक दुर्दैवी घटनाही घडल्या असून काही निष्पापांना आपला बळीही द्यावा लागला आहे. प्रशासनाने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन येथून सुरु असलेला हा बेकायदा वाळू उपसा त्वरीत थांबवावा व प्राचिन घाटांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करावे.
– नीलेश जाजू
अध्यक्ष – संगमनेर व्यापारी असोसिएशन


प्रचंड वाळू उपशातून होत असलेली पर्यावरणाची हानी थांबावी यासाठी आम्ही सातत्याने शासन आणि प्रशासनाला विनंत्या आणि आर्जवे केली. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनाही गंगामाई परिसरात बोलावून हे सगळे प्रकार आणि त्यामुळे झालेले निसर्गाचे नुकसान प्रत्यक्ष दाखवले, पण त्यांच्याकडून अपेक्षित कारवाई दूरच साधी समर्थनार्थ प्रतिक्रियाही मिळाली नाही. या परिसरातील वाळू उपशामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होण्यासह अंघोळीसाठी येणार्‍या नागरिकांचेही जीव धोक्यात आले आहेत. हा प्रकार न थांबल्यास आणखी तीव्र आंदोलन करु.
– डॉ.राम मुळे
सामाजिक कार्यकर्ते

Visits: 101 Today: 1 Total: 1112658

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *