आशा कर्मचारी व गटप्रवर्तक मंगळवारपासून संपावर

नायक वृत्तसेवा, अकोले
आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून (ता.15) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सिटूसह इतर विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या फेडरेशनच्यावतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत सोमवारी (ता.14) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शेटे यांना निवेदन सादर केले.

राज्य सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचे कामही अतिरिक्त मोबदला न देता करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटीजेन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणार्‍या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप होत आहे. सदर निवेदन देतेवेळी आशा कर्मचारी संघटनेच्या नेत्या संगीता साळवे, भारती गायकवाड, छाया कुळधरण, चित्रा हासे, अस्मिता कोते, सुनीता गजे, रुपाली पवार, अरुणा चव्हाण यांसह मोठ्या संख्येने आशा सेविका उपस्थित होत्या. तर किसान सभेचे डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, ज्ञानेश्वर काकड यांनी संपाला पाठिंबा जाहीर केला.

Visits: 14 Today: 1 Total: 118935

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *