भक्तांनो, आपला ‘बाप्पा’ आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलाय.. उत्सव संपला अन् विषय मिटला; प्रत्येकाला ‘अंतर्मुख’ करणारे दृष्य..


श्याम तिवारी, संगमनेर
आपण संस्कृतीप्रिय.. उत्सवप्रिय म्हणून बडेजाव मिरवणारे, आमचा उत्सव सव्वाशे वर्षांचा, वाहत्या पाण्याशिवाय विसर्जन हा विचारच आमच्या गावी शिवत नाही, प्रसंगी त्यासाठी आंदोलन उभारुन शासनाला आमचा मनसुबा पूरा करण्यासाठी भाग पाडणारी आमची परंपरा. पण, खरोखरी यातून आपण आपल्याच उत्सवांचे पावित्र्य जोपासतोय का?. काल-परवा पर्यंत घरोघरी आणि गल्लीबोळातील मांडवांमधून बसवलेला बाप्पा आज कोणत्या अवस्थेत असेल? याचा विचार तरी केलाय का?. दहा दिवस धुपदीप आणि नैवेद्य भरवून स्वतःला बाप्पाचा भक्त म्हणवून घेणार्‍या प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणारं दृष्य सध्या संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रात जागोजागी बघायला मिळत आहे. मोठा डामडौल करीत दहा दिवस अबालवृद्धांनी पूजलेला बाप्पा आज स्वतःच असाहाय होवून ‘असंच सोडायचं होतं तर मग बसवलंच कशाला?’ असं काहीसं पुटपुटत आपल्या भक्तांच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय.


ऐतिहासिक शहरांमध्ये गणना होणार्‍या संगमनेरचा सार्वजनिक गणेशोत्सवही 130 वर्षांचा आहे. भाद्रपदातील दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोशपूर्ण वातावरणात घरोघरी गणरायाचे आगमन होते. या उत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळांच्या उपक्रमांमध्ये बदल होत गेले असले तरीही या उत्सवाच्या आयोजनामागील भाव मात्र आजही टिकून आहे. महाराष्ट्रात दीड दिवसापासून ते दहा दिवसांपर्यंत घरोघरी पार्थिव गणेशाची स्थापना करुन भक्तिभावाने बाप्पांची आराधना केली जाते. अबालवृद्धांकडून बुद्धीच्या देवतेचे पूजन, भजन-कीर्तन होते. घरोघरी लहान-थोरांकडून सजावट केली जाते, रोज धुपदीप आणि पूजा-अर्चनेने बाप्पांच्या उत्सवाचे दहा दिवस अक्षरशः भक्तिरसाचा वर्षाव करणारेच असतात. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनंत चतुदर्शीला मोठ्या जल्लोशात मात्र भावपूर्ण अंतःकरणाने बाप्पा काही चुकलं तर पदरात घे म्हणत मिरवणूका काढून पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालीतच त्यांना विसर्जनासाठी नेले जाते आणि व्यवस्थेनुसार त्यांना निरोप दिला जातो.


संगमनेरात या उत्सवाची सुरुवात झाल्यापासून प्रवरानदीच्या वाहत्या पाण्यातच बाप्पांचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. यापूर्वी 2012 साली राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावल्याने धरणांमधील जलसाठ्यांवर नियंत्रण आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर साजर्‍या झालेल्या त्यावेळच्या गणेशोत्सवाला इतिहासात पहिल्यांदाच प्रवरेचे पात्र कोरडेठाक पडले होते. विसर्जनासाठी पाणी सोडावे अशी जोरदार मागणीही झाली. शिष्टमंडळांनी जिल्हाधिकार्‍यांसह राजकारण्यांच्याही भेटी घेतल्या. मात्र त्यावेळच्या स्थितीचा विचार करता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने विसर्जनासाठी आवर्तन सोडावे यासाठी संगमनेरात जनआंदोलन उभे राहिले आणि सार्वजनिक मंडळांसह तब्बल 60 हजार घरगुती गणरायांचे विसर्जन खोळंबले.


अनंत चतुर्दशीचा दिवस मावळून आठवडा उलटला तरीही संगमनेरकर माघार घेत नाहीत म्हटल्यावर शासनाला झुकावे लागले आणि स्थापनेपासून तब्बल 19 व्या दिवशी भंडारदर्‍यातून प्रवरापात्रात पाणी आल्यानंतर पितृपक्षात संगमनेरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पांना वाहत्या पाण्यात सोडल्याचा उन्माद करीत भावपूर्ण निरोप दिला. त्यानंतर तसाच प्रसंग 2015 सालीही उभा राहीला होता, त्यावेळी देखील तशीच भूमिका घेण्याची तयारी सुरु झाल्याने शासनाने विसर्जनाच्या दिवशी पहाटे आवर्तन सोडले, मात्र संगमनेरात पाणी पोहोचण्यास प्रत्यक्ष विसर्जनाच्या दिनी सायंकाळ झाली. परंतु तो पर्यंत संगमनेरकर पाण्याची प्रतिक्षा करीत होते हे विशेष. त्यानंतरच्या दशकभरात मात्र पुन्हा असा संघर्ष निर्माण झाला नाही. यंदाही धरणं भरलेली असली तरीही पाऊस बंद झाल्याने नद्यांचे पात्र कोरडे होते. मात्र ऐन गणेशोत्सवादरम्यान पाणलोटात झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांचे पात्र फुगले. त्यामुळे संगमनेरचे विसर्जनही निर्विघ्नपणे पार पडले.


दुर्दैवाने अनंत चतुदर्शीच्या दिनीच पावसानेही पूर्ण उघडीप दिल्याने एकीकडे विसर्जन सुरु असताना दुसरीकडे पात्रातील पाण्याचा प्रवाह देखील आटत होता व विसर्जनाचा दुसरा दिवस उजेडेपर्यंत धरणांमधून सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णतः थांबवला गेल्याने नदीतील पाण्याची पातळीही खूप कमी झाली. त्याचा परिणाम पाण्यात सोडलेल्या बहुतेक पार्थिक गणेशाच्या मूर्ती पुन्हा वरती आल्या असून पात्रात जागोजागी सर्वत्र छिन्न अवस्थेत पडलेल्या त्यांच्या अवशेषांचा खच पाहून मनं अक्षरशः खिन्न होतं आहे. काल-परवा पर्यंत जे बाप्पा राजेशाही थाटात घराघरात विराजमान होते, ज्यांच्या पुढ्यात विविध प्रकारच्या मोदकांसह नैवेद्यांची भरमार होती, ज्यांचे अबालवृद्धांकडून धुपदीपाने गुणगान गायलं जातं होते, आगमनाला आणि विसर्जनाला ज्यांच्या मिरवणुका काढून जल्लोशाने स्वागत, दहा दिवसांचा मोठा उत्सव आणि शेवटी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत ज्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला गेला होता, तेच बाप्पा आज नद्यांच्या पात्रात असाहाय असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.


ज्यांना आपण देव म्हणून घरात बसवलं, दहा दिवस उत्सव केला तोच बाप्पा आपल्या भक्तांना मदतीचे साकडं घालीत निराशपणे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. काय म्हणावे या उत्सवाला?. एखाद्या लहान मुलाने हट्ट करावा आणि त्याच्या बापाने तो मोठ्या कष्टाने पुरवावा, त्यातून त्या बाळाला त्या गोष्टीचे महत्त्व कळालंय असं होतं नाही. 2012 साली वाहत्या पाण्याचा आपला हट्ट शासनाने पुरवला, मात्र त्याच दिवशी आवर्तन बंदही झाले आणि आजच्या स्थितीप्रमाणे त्यावेळीही बाप्पा दुसर्‍याच दिवशी उघड्यावर पडले. मग वाहत्या पाण्याच्या सातत्यपूर्ण आग्रहातून आपण नेमकं काय साधतोय याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही?. कोणी वर्षभर तर, कोणी दहा दिवस मनोभावे पूजलेला, आपला आनंद आणि वेदना श्रवलेला, आपल्या घरातील सदस्य म्हणून प्रसंगात सहभागी झालेला बाप्पा असा असाहाय होवून खंड खंड होत पात्रात पडलेला आपल्याला रुचणार आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे शोधताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पर्याय शोधण्याची आणि ते स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.


उत्सव झाल्यानंतर उत्सवमूर्तीलाच विसरण्याची आपली संस्कृती नाही. विविध संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलेले अहवाल, उच्च न्यायालयाकडून सुरु असलेल्या सुनावणी दरम्यानचे निर्देश, भविष्यात त्यातून निर्माण होवू पाहणार्‍या समस्या यांचा सारासार विचार होवून पर्यावरणपूरक गणशेमूर्तींच्या वापराबाबत व्यापक जनजागृतीची गरज आहे. सध्या वापरात असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दीर्घकाळ विरघळत नसल्याने विसर्जनानंतरही देवता म्हणून स्थान असलेल्या प्रतिकांची विटंबणा होण्याचा आणि त्यातून उत्सवांचे पावित्र्यच नष्ट होण्याचा धोका आहे. या गोष्टींकडे अधिक गांभीर्याने पाहून कालानुरुप उत्सवमूर्तीचे स्वरुप बदण्याची आणि सर्वानुमते त्याचा स्वीकार होण्याची गरज आहे.

Visits: 358 Today: 5 Total: 1103759

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *