सरपंच सेवा संघाच्या अकोले तालुकाध्यक्षपदी मालुंजकर
![]()
नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या अकोले तालुकाध्यक्षपदी रुंभोडीचे सरपंच रवींद्र मालुंजकर, उपाध्यक्षपदी मोग्रसच्या सरपंच ज्योती गायकर व सचिवपदी औरंगपूरच्या सरपंच स्वाती वाळुंज यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी दिली आहे.

गुरुवारी (ता.10) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, उद्योजक सुरेश गडाख, अशोक देशमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पर्बत नाईकवाडी आदी उपस्थित होते. दरम्यान, रवींद्र मालुंजकर हे आमदार डॉ.किरण लहामटे यांचे कट्टर समर्थक असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. तर ज्योती गायकर या अकोले पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास गायकर यांच्या स्नूषा आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.
