शेतकर्‍यांना खते-बियाणे वेळेत उपलब्ध करुन द्या ः थोरात संगमनेर उपविभागीय कार्यालयात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बोगस बियाणे, कीटकनाशके यावर कृषी विभागाने अधिकाधिक देखरेख करून बियाणे व खतांच्या वापराबाबत बांधावर जाऊन माहिती द्या. तसेच सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत शेतकरी ते ग्राहक नाते निर्माण करून सेंद्रीय शेती पिकांची विक्रीसाठी नियोजन करा. सर्व शेतकर्‍यांना खते व बियाणे वेळेत उपलब्ध करून द्या अशा सूचना माजी कृषीमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर उपविभागीय कार्यालय येथे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, अजय फटांगरे, मीरा शेटे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, जिल्हा बँकेचे संचालक गणपत सांगळे, किरण मिंडे, विष्णूपंत रहाटळ, बी. आर. चकोर, सुभाष सांगळे, विजय रहाणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी अनिल नागणे, प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, शीतल घावटे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, डॉ. सुरेश घोलप आदिंसह सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील शेतकर्‍यांना मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खतांबाबतचे प्रशिक्षण द्या. कृषी विभागाने बोगस बियाणे व बोगस कीटकनाशके यावर देखरेख ठेवताना सर्व शेतकर्‍यांना वेळेत खते व बियाणे उपलब्ध होतील यासाठी नियोजन करा. तालुक्यात सोयाबीन उत्पादन वाढत असून या पिकाच्या बियाणाबाबत अडचण निर्माण होत असते. काही बियाणांमध्ये उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाले असून याबाबत वेळीच काळजी घ्या. तसेच शेतकर्‍यांना पीक विम्यासाठी असलेल्या उंबरठा योजनेबाबत माहिती सांगा. सेंद्रीय शेती ही काळाची गरज असून सेंद्रीय उत्पादित मालांना मोठी बाजारपेठ आहे. म्हणून शेतकरी ते ग्राहक असे नाते निर्माण करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल. यावर्षी अललिनोच्या प्रभावामुळे उशिरा येणारा पाऊस आणि कमी पाऊस या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. नवीन वाण व सेंद्रीय शेतीबाबत शेतकर्‍यांमध्ये अधिकाधिक जागृती करा असे आवाहन केले. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, खत विक्रेते यांसह शासकीय विभागांचे विविध अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केले तर नायब तहसीलदार लोमटे यांनी आभार मानले.

Visits: 144 Today: 1 Total: 1112399

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *