नांदूर खंदरमाळमध्ये बिबट्याच्या हल्यात मेंढपाळ जखमी
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या लहुचामळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी झाले आहे. सदर घटना गुरुवारी (ता.10) मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत वन विभागाने दिलेली अधिक माहिती अशी की, जांबुत बुद्रुक येथील मेंढपाळ कुशाबा हरिभाऊ देवकर हे मेंढ्या चारण्यासाठी नांदूर खंदरमाळ शिवारातील लहुचामळा येथे आले आहेत. बुधवारी सायंकाळी मेंढ्या वाघुरीत कोंडल्यानंतर ते रात्रीच्या वेळी जेवण करून वाघुरी जवळच झोपले होते. तसेच कुत्राही जवळच बसलेला होता. दरम्यान, अचानक बिबट्याने कुत्र्यावर झेप घेतली. परंतु, शेजारी असलेल्या देवकर यांनाच बिबट्याने जोराचा पंजा मारला. त्यामुळे त्यांच्या तोंडावर नखी ओरखडल्याने ते जखमी झाले. गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती समजताच वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता थोरात व रोहिदास भोईटे यांनी घटनास्थळी धाव घेत देवकर यांना औषधोपचारार्थ घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तत्पूर्वी, गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्याने मोरे मळ्यात चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
