संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संगमनेरात ‘टास्क फोर्स’! दहा खासगी बालरोग तज्ज्ञांचा समावेश; ग्रामीण रुग्णालयात दहा खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंतच्या नागरिकांना कोविडची लागण झाली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयंकर आणि अधिक जीवघेणी ठरल्याने त्यातून अनेक बाधितांचे जीवही गेले. आता देशभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसर्या संक्रमणापासून लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी डॉ.जयश्री जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेरातील दहा खासगी बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेला ‘टास्क फोर्स’ स्थापन केला असून त्याद्वारे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राला बालकांवरील कोविड उपचारांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासोबतच घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांसाठी दहा खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी कोविड संक्रमणाच्या पहिल्या लाटेने जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांना बाधित केल्यानंतर चालू वर्षी फेब्रुवारीत सुरु झालेल्या दुसर्या संक्रमणात तरुणांनाही कोविडची लागण झाली. त्या अनुषंगाने राज्याच्या टास्क फोर्ससह देशभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला आहे. संक्रणाच्या दुसर्या लाटेतही बाधित होणार्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आले आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थानाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लहान मुलांच्या उपचारांसाठी आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले असून तालुकास्तरावर बालरोग तज्ज्ञांचा ‘टास्क फोर्स’ स्थापित करण्यासह लहान मुलांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एकभाग म्हणून तालुक्यातील बालरोग तज्ज्ञ, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व सर्वेक्षणामध्ये सहभागी कर्मचारी यांना ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लहान मुलांचे कोविड उपचार, अतिदक्षता विभाग, तसेच प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील दहा खासगी बालरोग तज्ज्ञांचा ‘टास्क फोर्स’ स्थापीत केला आहे.

या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदाची धुरा बालरोग तज्ज्ञ डॉ.जयश्री जाधव यांच्यावर सोपविण्यात आली असून सचिवपदी डॉ.योगेश निघुते यांना जबाबदारी देण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या सदस्यपदी डॉ.ओमप्रकाश सिकची, डॉ.राजेंद्र के.मालपाणी, डॉ.दिलीप बोरा, डॉ.राजेंद्र खताळ, डॉ.उज्ज्वला जठार, डॉ.बापूसाहेब काकड, डॉ.संदीप होन व डॉ.बद्रुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली. या बालरोग तज्ज्ञांसमवेत प्रशासनाने आत्तापर्यंत तीनवेळा बैठका घेतल्या असून तिसर्या संक्रमणापासून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासह बाधित होणार्या मुलांवर उपचार करण्याच्या पद्धती, औषधांचा वापर यासह सौम्य लक्षणे असणार्या मुलांसाठी स्वतंत्र विलगीकरण (सीसीसी) कक्ष यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून आवश्यक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे.

संगमनेरात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे सदस्य टप्प्याटप्प्याने संगमनेर तालुक्यातील खासगी व नागरी क्षेत्रातील डॉक्टरांसह परिचारिका, आरोग्य सेवक व सर्वेक्षण करणार्या कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेणार असून तिसर्या लाटेत अंदाजानुसार लहान मुले संक्रमित झाल्यास त्यांच्यावर उपचार सुरू असणार्या ठिकाणी वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देवून उपचारांविषयी मार्गदर्शनही करणार आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील कोणत्याही बालरोग तज्ज्ञांने त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी पूर्ण न केल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 56 अन्वये कारवाई देखील होऊ शकते. इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांच्या या आदेशान्वये कोविडसंक्रमणाची तिसरी लाटही आपल्या दारात उभी असल्याचे दिसत असून नागरिकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबातील लहान मुलांसाठी कोविड नियमांचे सक्तिने पालन करण्याची गरज आहे.

देशभरातील तज्ज्ञांनी कोविडचे तिसरे संक्रमण लहान मुलांना घातक असल्याचा इशारा दिला आहे. त्यादृष्टीने आपण तालुका पातळीवर खासगी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्यांच्यासोबत नियमित बैठका घेवून त्यानुसार उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशानुसार घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांसाठी दहा खाटांचा अतिदक्षता विभागही कार्यान्वीत करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन मुबलक असून लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठाही करण्यात आला आहे. याशिवाय खासगी आणि नागरी सेवेतील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांना पुढील आठवड्यापासून प्रशिक्षणही देणार आहोत.
– डॉ.राजकुमार जर्हाड
वैद्यकीय अधीक्षक-ग्रामीण रुग्णालय, संगमनेर
![]()
खासगी बालरोग तज्ज्ञांशी विचारविनिमय करुन कोविड संक्रमणाच्या संभाव्य तिसर्या लाटेबाबत विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून खासगी बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेला ‘टास्क फोर्स’ही स्थापन झाला आहे. संभाव्य लाटेतून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासह बाधित झालेल्या लहान मुलांवर कोठे व कसे उपचार करावेत याचेही नियोजन सुरू असून लहान मुलांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष (सीसीसी) सुरु करण्याबाबतही निर्णय झाला आहे. सध्या सुरू असलेल्या आरोग्य सर्वेक्षणात लहान मुलांच्याही तपासण्या सुरु कररण्यात आल्या असून त्यांची काळजी घेण्याबाबत पालकांना सूचना करण्यात येत आहेत. बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सकडून येणार्या प्रत्येक सूचनेची अंमलबजावणी केली जाणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावर 75 खाटांची व्यवस्था करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.
– अमोल निकम
इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार, संगमनेर

