संगमनेर खुर्दचे शिवार बनले वाळू तस्करांचे आगार! वाहत्या पाण्यातूनही रात्रभर उपसा; तक्रारी करुनही प्रशासन ढिम्मच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रशासनाच्या अवकृपेने लायकी नसलेल्यांना लखपती बनविणाऱ्या वाळूमूळे संगमनेर खुर्दचे ग्रामस्थ अक्षरशः मेटाकूटीला आले आहेत. प्रशासनाची साथ, वाहतुकीसाठी प्रशस्त रस्ते आणि चुकून छापा पडलाच तर पळायला आणि लपायला बक्कळ जागा यामुळे खुर्दच्या प्रवरा पात्रात रात्रीच्या वेळी तस्करांची अक्षरशः झुंबड उडत आहे. धक्कादायक म्हणजे सध्या प्रवरा नदीपात्रातून पाणी वाहत असतानाही निगरगठ्ठ बनलेल्या या तस्करांचा उद्योग थांबलेला नसून पाण्यात फरांडी टाकून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु आहे. याबाबत खुर्दच्या खुद्द ग्रामपंचायतीने आयजीपासून तलाठ्यापर्यंत सर्वांकडे लेखी तक्रारी करुन पाहील्या, मात्र ‘हमाम में सब नंगे’ असल्यागत काेणीही त्याची दखल घेण्यास तयार होईना अशी स्थिती आहे. त्यामुळे हिम्मत वाढलेल्या तस्करांनी आता काेट्यवधी रुपयांचा चुराडा करुन बांधलेला पालिकेचा ‘शांतीघाट’ही पाेखरायला सुरुवात केली आहे.

संगमनेर आणि वाळू तस्करी हे सूत्र आता नवीन राहीलेलं नाही. दीड-दाेन दशकांपूर्वीपर्यंत अभावानेच नद्यांच्या पात्रातून परस्पर वाळू उचलण्याची काेणाची हिम्मत हाेत असतं. मात्र नंतरच्या काळात कार्यकर्त्यांना पाेसण्याचे पर्याय शाेधताना उत्तरेतील बहुतेक राजकारण्यांना नद्यांच्या पात्रात भरभरुन असलेली वाळू दिसू लागली आणि हजाराें वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रवाहातून निर्माण झालेल्या गाैण खनिजांवर राजकीय नियंत्रण निर्माण होवू लागले. हा सगळा मामलाच बेकायदेशीर असल्याने उपसा करण्यासाठी कोणताही शासकीय कर भरण्याची गरज नव्हती. त्यामुळे या कराची जागा अधिकाऱ्यांच्या वसुलीने घेतली. त्यातुन सुरुवातीला एकाचे दोन आणि सध्या शंभराचे तिनशे या गतीने ही जमात अगदी बाेट्यातून वाहणाऱ्या कासनदीच्या वाळवंटापासून संगमनेरातून वाहणाऱ्या म्हाळुंगीच्या पात्रापर्यंत प्रचंड फोफावली. आज या वाळू तस्करांनी अक्षरशः भस्मासुराचे रुप धारण केले असून त्यांच्या कृत्याला विराेध केल्यास थेट जीवावर बेतू शकते इतकी स्थिती खालावली आहे.

मात्र संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे आणि ग्रामविकास अधिकारी नंदराम पवार यांना प्रवरामाईचे दरराेज ताेडले जाणारे लचके असह्य झाल्याने त्यांनी त्या विरोधात आवाज उठवला. तरीही त्यांच्याकडे काेणीही बघायला तयार होईनात. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकृत लेटरहेडवर वाळू तस्करांची संपूर्ण कथा लिहून त्यांच्या बंदाेबस्ताच्या विनंतीसह प्रांताधिकाऱ्यांपासून पाेलीस निरीक्षकांपर्यंत सर्वांना त्याच्या प्रति पाठवल्या. मात्र काेठूनही कारवाईची आशा निर्माण झाली नाही. साेमवारी (ता.9) नाशिक विभागाचे विशेष पाेलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे संगमनेरात आले हाेते. यावेळी संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांनी त्यांच्याकडेही आपले गाऱ्हाणे मांडले व लेखी निवेदनाद्वारे तक्रारही केली.

वरील सर्व अधिकाऱ्यांना पाठवलेल्या तक्रारीत संगमनेर खुर्दची ग्रामपंचायत म्हणते, आमच्या भागातील नदीपात्रातून प्रचंड वाळू उपसली जात आहे. नदीपात्रात गावाच्या पाणी पुरवठ्याची विहीर आहे. मात्र वाळूचाेर त्याच ठिकाणी माेठे खड्डे करुन वाळू काढीत असल्याने झालेल्या खड्ड्यांमध्ये दुषित पाणी गाेळा हाेवून त्याचा विहीरीत निचरा हाेताे. तेथून मिळणाऱ्या पाण्यावरच ग्रामपंचायतीद्वारे पाणीपुरवठा हाेत असल्याने ग्रामस्थांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याच परिसरात प्रवरा आणि म्हाळुंगी नदीचा संगम हाेताे, त्यामुळे पालिकेने काेट्यवधी रुपयांचा खर्च करुन या संगमावरच ‘शांतीघाट’ बांधला आहे. अर्थात संगमनेर शहरातून या घाटावर जाण्यासाठी आधी गटारगंगा ओलांडीत दुर्गंधी पोटात घ्यावी लागते.

वाळू तस्करांनी आता या घाटाचाही परिसर ताब्यात घेतला आहे. सूर्यास्त झाला रेऽ झाला की तस्करांच्या टाेळ्या या भागातील आपापल्या फुकटात हक्क मिळवलेल्या वतनांवर जमा हाेतात आणि रात्रभर प्रवरामाईचे लचके ताेडीत असतात. या दरम्यान पाेलिसांचे पेट्रोल वाहन, महसूलचे कर्मचारी आपापली माेहरही उमटवून जातात हे वेगळं सांगायला नकाे. दहा-वीस हजारांची बंडलं फेकून नदीचे मालक झालेले हे तस्कर आता थेट पालिकेच्या शांतीघाटालाही भिडले आहेत. या घाटाचा आसपासचा परिसर काेरण्यास सुरुवात झाली असून पुढील काही कालावधीत हा घाटही नामशेष झाल्यास आश्चर्य वाटायला नकाे.

खरेतर या ठिकाणी सावरगाव तळपासून दहा ते बारा गावांचे दहाव्याचे विधी हाेतात. काेणत्याही स्थितीत या परिसरातून पाटीभरही वाळू उपसण्यास प्रतिबंध असण्याची गरज आहे. त्यासाेबतच संगमनेरच्या सार्वजनिक गणेशाेत्सवातही हा परिसर सर्वाधीक वर्दळीचा आणि विसर्जनासाठी माेठ्या प्रमाणात वापरला जाणारा आहे. त्यामुळे या भागातून वाळू उपसा हाेणं म्हणजे सर्वसामान्य नागरीकांच्या जीवाशी खेळण्यासारखे असून प्रांताधिकाऱ्यांपासून ते तलाठ्यांपर्यंत आणि पाेलीस उपअधिक्षकांपासून रात्रपाळीच्या अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने मानवी सुरक्षेचा विचार करुन संगमनेर खुर्दच्या नदीपात्रातून सुरु असलेला अविरत वाळू उपसा त्वरीत थांबवण्याची आणि तेथील तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

सध्या प्रवरा नदीपात्रात पाणी असतानाही तस्करांचा उद्याेग थांबलेला नसून त्यांनी वाहत्या पाण्यातूनही वाळूचाेरीचे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी ट्रॅक्टरच्या फरांडी पात्रात नेवून साेडल्या जातात व त्याला दाेरखंड बांधून काठावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरद्वारा त्या ओढून वाळू काढली जात आहे. रात्रभर सुरु राहणाऱ्या या आवाजाने आसपासचे नागरीक अक्षरशः मेटाकूटीला आले असून वारंवार सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही कारवाई हाेत नसल्याने हतबल झाले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतच पुढे सरसावली असून शिवारातील वाळू उपसा थांबवण्यासाठी निवेदनापाठाेपाठ आंदाेलनाच्या पवित्र्यात आली आहे.

सध्या प्रवरानदीला पाणी असतानाही वाळू तस्करी थांबलेली नाही, यावरुन येथील तस्करीला प्रशासनाचे पाठबळ असल्याचे उघडपणे दिसून येते. विशेष म्हणजे संगमनेर खुर्दच्या ज्या भागातून रात्रभर हा उपसा सुरु असताे ताे भाग संगमनेर शहरातील नदीकाठावरुनही सहज दृष्टीस पडताे. रात्री सात वाजता सुरु हाेणारा हा उपसा पहाटेपर्यंत चालू असताे, मात्र त्याची खबर ना पाेलिसांना मिळते, ना महसूल प्रशासनाला. ही गाेष्ट तस्कारांशी या यंत्रणांचे हितसंबंध असल्याचे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

Visits: 1800 Today: 1 Total: 114813

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *