संगमनेर तालुक्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन दरवाढ कमी करण्याची मागणी; विविध मुद्द्यांवरही केंद्रावर डागली तोफ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भरमसाठ किंमती वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस समितीच्यावतीने तालुक्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.
संगमनेर तालुका काँग्रेस समितीच्यावतीने शेतकी संघ, बोटा, मंगळापूर, निमगाव जाळी, तळेगाव दिघे येथील पेट्रोल पंपांवर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शिवाजी थोरात, शंकर खेमनर, सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, विजय हिंगे, संतोष हासे, विष्णूपंत रहाटळ, सोमनाथ जोंधळे, अॅड.सुहास आहेर, संतोष शेळके, अर्चना बालोडे, सुभाष सांगळे, सीताराम राऊत, गौरव डोंगरे, प्रा.बाबा खरात, नितीन अभंग, आनंद वर्पे, शेखर सोसे, भारत मुंगसे, बाळासाहेब गायकवाड, नवनाथ महाराज आंधळे, संजय कोल्हे, रोहिदास पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ.तांबे म्हणाले, मोदी सरकार हे भूलथापा देऊन सत्तेवर आलेले सरकार आहे. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसची भरमसाठ वाढ केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अत्यंत कमी असताना नफेखोरीसाठी केंद्र सरकार सामान्यांना वेठीस धरत आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. बेरोजगारी वाढली असून सर्वत्र अशांतता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ठोस निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकार मताचे राजकारण करून जनतेमध्ये फूट पाडत आहे. यामुळे देशाची एकात्मता धोक्यात येऊ शकते. लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रीय झाले पाहिजे. यूपीए सरकारच्या काळात डॉ.मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली याच स्थितीत असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीवेळेस पेट्रोल हे 60 रुपये लिटर होते. आज मात्र शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. अच्छे दिनच्या ऐवजी बुरे दिन सुरू झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब आणि सामान्य माणूस अत्यंत वैतागलेला आहे. या सामान्य माणसाची अस्वस्थता सरकारने जाणून घेऊन तातडीने गोरगरिबांवर लागलेली भाववाढ कमी करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
इंद्रजीत थोरात म्हणाले, केंद्र सरकारने अत्यंत जुलमी पद्धतीने ही भाववाढ केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात मोठे आंदोलन होत आहे. महागाईमुळे मोठी अस्वस्थता सामान्य माणसांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्वांना केंद्र सरकार जबाबदार असून कोरोना संकटात धीर देण्याऐवजी अत्यंत कष्टमय जीवन जनतेवर लादले जात असल्याची टीका त्यांनी केली.
तळेगावमध्ये सरपंच बाबाजी कांदळकर, रावसाहेब दिघे, संगमनेरमध्ये दत्तू खुळे, जावेद शेख, तात्या कुटे, विजय उदावंत, गबाजी खेमनर, अण्णासाहेब थोरा, शालन गुंजाळ, निमगाव जाळीमध्ये सोमनाथ जोंधळे, राम तांबे, नितीन कोकणे, दिनकर आंधळे, राजेंद्र चकोर, अनिल डेंगळे, बोट्यामध्ये संतोष शेळके, अरुण वाघ, बाळासाहेब कुराडे, यशवंत कुराडे आदिंसह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.बाबा खरात यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विडंबन गीते सादर केली.