सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकरच कार्यान्वीत होणार : आमदार तांबे ‘पत्रकार कट्टा’ कार्यक्रमात स्पष्टोक्ती; फेरीवाल्यांसाठी आता ‘बिल्ला’ पद्धत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील प्रलंबित विकासकामांच्या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यात पालिका सभागृहात तीनवेळा आढावा बैठका घेण्यात आल्या. त्यात रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार, रखडलेली भुयारी गटार योजना, रस्त्यांची अवस्था अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. पालिकेच्या प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला झालेल्या विरोधामूळे बाकीच्या सर्वच गोष्टींना विलंब झाला. मात्रयेत्या सहा महिन्यांत या सर्व गोष्टी पूर्ण होतील आणि सुंदर शहराचं वास्तव दर्शन आपल्याला घडेल असा विश्‍वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.


संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ‘पत्रकार कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष मंगेश सालपे, उपाध्यक्ष अमोल मतकर, खजिनदार संजय आहिरे व सचिव शेखर पानसरे उपस्थित होते. जवळपास दोनतास चाललेल्या या कार्यक्रमात शहरातील पत्रकारांनी विविध प्रश्‍नांद्वारे नागरी व विकासाचे मुद्दे उपस्थित केले, त्यावर आमदार तांबे यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली.


शहरातील रस्त्यांवर जमा होणारे पावसाचे पाणी, अनेक महिन्यांपासून भूमिगत गटारांसाठी खोदले गेलेले रस्ते, यावर प्रकाश टाकताना त्यांनी भुयारी गटार योजना ही फक्त सांडपाणी वाहून नेण्यासाठी असल्याने त्यात पावसाच्या बाह्य पाण्याचा अंतर्भाव होत नसल्याचे स्पष्ट केले. आढावा बैठकीतही यावर सखोल चर्चा केली. त्यावेळी हा विषय प्रकर्षाने समोर आल्यानंतर आपण पावसाच्या पाण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याची योजना आखली, त्याचा आराखडा मंजूर करुन घेतल्यानंतर आता भुयारी गटारांसह पावसाच्या पाण्यासाठीही स्वतंत्र लाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात आल्याकडे त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

भुयारी गटाराचे काम खोळंबण्यामागे मोठे कारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा निश्‍चित झाली. मात्र त्या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करताना तेथील स्थानिक रहिवाशांनी वास येईल, रोगराई पसरेल अशा गैरसमजातून त्याला विरोध केला. खरंतर मुंबईसारख्या महानगरात अगदी हॉटेल ताज शेजारी आणि शाहरुख खान यांच्या बंगल्याच्या बाजूलाच मुंबई महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. हा प्रकल्प जर त्रासदायक असता तर तो तेथे उभा राहीला असता का? असा सवाल करीत त्यांनी संगमनेरात याबाबत चुकीची माहिती पसरवली गेल्याने या प्रकल्पाला विरोध झाल्याचे त्यांनी नमूद केले.


हा प्रकल्प अन्यत्र हलवावा अशी तेथील रहिवाशांची मागणी आहे. मात्र त्यासाठी आपल्याला नदीकाठावर पर्यायी पाच एकर जागा लागेल, ती उपलब्ध होण्याची शक्यता अतिशय दुर्मीळ असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या प्रकल्पाचे आणि पर्यायाने भुयारी गटारांचे काम खोळंबले. मात्र त्यावर उपाय शोधतांना आपण नवीन तंत्रज्ञान आणले असून मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने अशा प्रकल्पांची रचना केली आहे, तीच पद्धत आपण संगमनेरातही वापरणार असल्याची माहिती आमदार तांबे यांनी दिली. त्यामुळे हा प्रकल्प येणार्‍या सहा महिन्यांतच आपण पूर्ण करणार आहोत. त्यासोबतच पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठीही आपण वेगळी योजना राबवित असून भुयारी गटारांसह त्याचेही काम पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.


शहरातंर्गत सर्वच भागात भुयारी गटारांची कामे सुरु आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्ते खोदले गेले आहेत. जो पर्यंत गटार आणि पावसाच्या पाण्याच्या पाईपलाईनची कामे होत नाहीत तो पर्यंत रस्त्यांची कामे करणंही शक्य नसल्याच्या वास्तवावर बोट ठेवतांना पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या कामालाही लगेच सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाला झालेल्या विरोधामुळे भुयारी गटारांचे आत्तापर्यंत केवळ 40 टक्केच काम झाले आहे. प्रकल्पाच्या कामात गटारांची पातळी फार महत्त्वाची असते. त्यातून गुरुत्त्वाकर्षणाने शहरातील सर्व सांडपाणी प्रकल्पापर्यंत गेलेच पाहिजे, त्यात थोडीही चूक अपेक्षित नसते, अन्यथा अडचणी निर्माण होतात. म्हणूनच जो पर्यंत वरच्या भागातील गटारांची कामे पूर्ण होत नाहीत, तो पर्यंत खालच्या भागातील कामांना सुरुवात करता येत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


शहर विकासाच्या दृष्टीने आपल्याला जे काही करणं आवश्यक होतं ते सगळं आपण केल्याचे सांगताना आमदार तांबे पुढे म्हणाले की, शहराच्या वाहतुक आणि पार्किंग व्यवस्थेबाबत यापुढे आपल्याला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. पण त्यामुळे आपण केवळ पालिकेला दोष देण्यात अर्थ नसल्याचे ते म्हणाले. लोकांमध्ये शिस्तीचा अभाव असल्याने खरेतर हा प्रश्‍न अधिक जटील बनला आहे. कोणीही कोठेही कशीही गाडी उभी करतो त्यामुळेच वाहतुकीची समस्या निर्माण होते. अनेक ठिकाणी भाजी घेण्यासाठीही माणसं गाडीवरुन खाली उतरत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.


भाजी विक्रत्यांनाही आपण विभाग आणि जागा ठरवून दिल्या आहेत. मात्र दोन-चार दिवसांतच परिस्थिती बदलते आणि भाजी विक्रेते पुन्हा थोडं पुढे करीत समस्या निर्माण करतात. अर्थात भाजी विकणारे आणि घेणारे दोन्ही आपलेच असल्याने त्यांच्या विरोधात किती कठोर भूमिका घ्यावी यालाही मर्यादा असतात. यासाठीही आपण नवीन पद्धत विकसित करणार असल्याचे सांगतांना लवकरच संगमनेरातील फेरीविक्रेत्यांसाठी आपण ‘बिल्ला’ पद्धत राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या योजनेतून एका कुटुंबाला एकच बिल्ला देण्यात येईल व त्यावर त्याला ठरवून दिलेल्या एकाच ठिकाणी व्यवसाय करता येईल. कारण आज एकाच कुटुंबातील चारजण शहराच्या चार कोपर्‍यात वेगवेगळी चार दुकाने लावतात, त्यामुळे दुकानांची संख्याही वाढते आणि सोबत समस्याही वाढतात.


एका कुटुंबाने मिळून एकाच ठिकाणी व्यवसाय करावा हा त्यामागील उद्देश असून त्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करणार असून मनात आलं की, घेतली पाटी अन् बसले कोठेही विकायला अशामुळे शिस्त लागू शकणार नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात पार्किंगचीही मोठी समस्या आहे. नवीन रुग्णालये, इमारती आपण बांधतो, पण पार्किंगबाबत मात्र कोणताही विचार करीत नाही. संगमनेर शहरात आज 90 टक्के मालमत्ताधारकांनी पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्रच घेतले नसल्याची धक्कादायक माहिती देताना त्यांची बांधकामे नियमाला धरुन नसल्याचे सांगितले. पण यात दोष कोणाला देणार असा सवाल करताना आपण सगळेजण त्यात असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.


मुंबईत बांधकाम परवानगी घेण्यासाठी बांधल्या जाणार्‍या वास्तूत किती माणसं येवू शकतात याचे नियोजन करुन परवानगी मागावी लागते. त्याशिवाय परवानगीच मिळत नाही. मात्र संगमनेरात आपण बिगर पूर्णत्वाच्या दाखल्याशिवाय करवसुली करतोय. नियमानुसार असलेल्या मालमत्ता धारकांकडूनच वसुली करण्याचे पालिकेने ठरवले तर पालिकेला मिळणारे उत्पन्नच बंद होईल असेही त्यांनी सांगितले. पालिकेचे कामकाज नफाफंड आणि केंद्र व राज्य सरकारकडून मिळणार्‍या पैशांवरच अधारित आहे. पालिकेला स्वउत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नाहीत. म्हणून सगळे प्रश्‍न निर्माण होतात. मात्र या गोष्टींवर व्यापक मंथन होण्याची गरज आहे. आपल्याला नेमक्या कोणत्या दिशेला जायचंय याचा एकदा विचार करावाच लागणार आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
(क्रमशः)


संगमनेर शहराची लोकसंख्या एकलाखाच्या घरात असून दररोज शहरात 50 हजार अन्य माणसं व विद्यार्थी येत असतात. त्यातील 60 हजार माणसं शहरातील फक्त सात ठिकाणांवरच गर्दी करतात. जो पर्यंत माणसं स्वतः शिस्त पाळणार नाहीत, तो पर्यंत कोणत्याही उपाययोजना या फारशा प्रभावी ठरणार नाहीत. शिस्त लावायची म्हणजे ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावा’ असा प्रश्‍न आहे. मात्र त्यातही कटूपणा घेवून आपल्याला पुढे जावे लागणार आहे.
सत्यजित तांबे
सदस्य : नाशिक पदवीधर मतदार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *