संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव आजही कायम! अहमदनगर, राहाता, राहुरी, शेवगाव व श्रीरामपूर तालुक्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी उंचावलेला जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख आज काहीअंशी खाली आल्याने जिल्हावासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आजच्या अहवालातून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत किंचीत घट झाली असली तरीही संक्रमण सुरु असलेल्या पाच तालुक्यातील परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्याचेही दिसून आले आहे. जिल्ह्यात आज एकूण 475 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात सहाजण बाह्य जिल्ह्यातील आहेत. तर संगमनेर तालुक्यातील 43 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले असून त्यात शहरातील पंधरा जणांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही भर पडून तालुका आता 7 हजार 467 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
गेल्या 1 मार्चपासून जिल्ह्यातील कोविड बाधितांचा आलेख उंचावण्यास सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 109 रुग्ण दररोज समोर येत होते. ती संख्या आजच्या स्थितीत सरासरी 342 रुग्ण दररोज या गतीवर जावून पोहोचली आहे. गेल्या 1 मार्चपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 5 हजार 473 रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात पुन्हा सुरु झालेल्या कोविड संक्रमणाची सर्वाधीक गती अहमदनगर तालुक्यात असून गेल्या सोळा दिवसांत तेथे 2 हजार 53, त्या खालोखाल संगमनेर तालुक्यात 658, राहाता तालुक्यात 635, कोपरगाव तालुक्यात 332, श्रीरामपूर तालुक्यात 257, शेवगाव तालुक्यात 254, पारनेर तालुक्यात 219 तर अकोले तालुक्यातून 173 रुग्ण समोर आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालातही वरील तालुक्यांमधील प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात कायम असून उर्वरीत तालुक्यातील रुग्णांमध्ये मात्र आज काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे. आज बाधित आढळलेल्या तालुक्यांमध्ये अहमदनगर 179 रुग्ण, राहाता 77, संगमनेर 43, शेवगाव 41, श्रीरामपूर व राहुरी प्रत्येकी 21, कोपरगाव 16, नेवासा 15, जामखेड व पारनेर प्रत्येकी 11, अकोले 10, पाथर्डी व श्रीगोंदा प्रत्येकी 7, कर्जत 5 व अन्य जिल्ह्यातील 6 जणांचा समावेश आहे. आज एकूण 475 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्रापत झाले आहेत. सोमवारच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.

संगमनेर तालुक्यात आढळलेल्या एकूण 43 जणांमध्ये शहरातील पंधरा जणांचा समावेश असून त्यात नवीन नगर रोडवरील 65 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 68 व 51 वर्षीय इसमांसह 31 वर्षीय महिला, गायत्री हाऊसिंग सोसायटीतील 40 वर्षीय तरुण, रंगारगल्लीतील 50 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण, उपासणी गल्लीतील 46 वर्षीय महिला, गणेश नगरमधील 42 वर्षीय तरुणासह 38 वर्षीय महिला, गणेश विहारमधील 32 वर्षीय महिला, अपना नगरमधील 30 वर्षीय तरुण, पद्मनगरमधील 59 वर्षीय महिला व केवळ संगमनेर असा उल्लेख असलेल्या 51 वर्षीय इसमासह 21 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यासोबतच ग्रामीणभागातील नान्नज दुमाला येथील 53 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 70 वर्षीय महिला, निळवंडे येथील 40 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 42 वर्षीय तरुण, पोखरी बाळेश्वर येथील 34 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगी, आश्वी खुर्दमधील 31 वर्षीय तरुणासह 24 वर्षीय महिला, घारगाव येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 34 वर्षीय महिला, डिग्रस मालुंजे येथील 45 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 52 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 64 वर्षीय महिला.

गुंजाळवाडीतील 43 व 42 वर्षीय तरुणांसह रहाणे मळ्यातील 40 वर्षीय महिला, राजापूर येथील 45 वर्षीय इसम, निंभाळे येथील 58 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 70 वर्षीय महिला, बोलेगाव येथील 71 वर्षीय महिला, बोटा येथील 70 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 33 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 44 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्दमधील 25 वर्षीय तरुणासह 22 वर्षीय महिला व सायखिंडीतील 65 वर्षीय महिला अशा एकूण 43 जणांना कोविडची बाधा झाली असून तालुक्याची रुग्णसंख्या आता 7 हजार 467 झाली आहे.

जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणातून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहे. संगमनेर तालुक्यात अद्यापही कोविडचे नियम पाळण्यात नागरिक चालढकल करीत असल्याने रोज नवनवीन भागातून रुग्ण समोर येत असल्याचेही समोर आले आहे. या संक्रमणात आता आत्तापर्यंत सुरक्षित असलेला व्यापारी वर्गही झपाट्यात येत असल्याने नियमांचे सक्तिने पालन करण्याची गरज आहे अन्यथा कोविडचे पुन्हा सुरु झालेले संक्रमण जिल्ह्याला लॉकडाऊनच्या दिशेने नेणारे ठरेल.

अकोल्यात आज आढळले दहा रुग्ण..
अकोले तालुक्यात आज दहा रुग्ण आढळून आले. त्यात शहरातील 24 वर्षीय तरुणासह शेकईवाडीतील 48 वर्षीय इसमासह 31 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महिला, धुमाळवाडीतील 56 वर्षीय महिला, हिवरगावमधील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खानापूरमधील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गणोरे येथील 1 वर्षीय बालक, शेळकेवाडीतील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक तर अंभोळ येथील 42 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

