‘प्रहार’च्या संगमनेर तालुका उपाध्यक्षपदी ढेरंगे
‘प्रहार’च्या संगमनेर तालुका उपाध्यक्षपदी ढेरंगे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठारभागातील आंबी दुमाला येथील भरत रामकृष्ण ढेरंगे यांची नुकतीच ‘प्रहार’ जनशक्ती पक्षाच्या संगमनेर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भरत ढेरंगे हे आंबी दुमाला गावचे रहिवासी असून घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच आहे. एका डोळ्याने अंध असताना देखील सामाजिक कार्याची तितकीच आवड, मग मी समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचारांतून त्यांनी संत गाडगेबाबांचे विचार अंगीकारुन ग्रामस्वच्छतेला महत्व दिले. आपले गाव स्वच्छ व सुंदर रहावे म्हणून स्वखर्चाने एक घंटागाडी बनवून ती आपल्या दुचाकीला बांधून गावातील गल्ली-बोळातून घंटा वाजवून कचरा गोळा करतात. घंटा वाजला की महिलाही कचरा आणून गाडीत टाकतात. त्यानंतर तो सर्व कचरा गोळा केल्यावर त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावतात. याचबरोबर त्यांनी आपल्या वृद्ध आईला माऊलींचे दर्शन घडावे म्हणून पायी वारी करुन पाठिशी बसवून दर्शन घडवले. प्रहारचे सर्वेसर्वा तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ढेरंगे हे पठारभागात काम करत आहे. याची दखल घेऊन ढेरंगे यांची यापूर्वी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या संगमनेर तालुकाध्यक्ष पदीही निवड करण्यात आली होती. या कार्यकाळातील कामाची दखल घेऊन आता त्यांची जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी संगमनेर तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे. याबाबतचे पत्रही त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे.