झोळेतील शासकीय जागा अनधिकृतपणे खासगी शाळेला बहाल! ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना निवेदन; चौकशी करुन कारवाईची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे असलेली आणि विद्यार्थी मैदान म्हणून वापर करत असलेली जागा सरपंच आणि ग्रामसेवकांनी अधिकाराचा गैरवापर करुन खासगी शाळेस दिल्याचा धक्कादायक प्रकार झोळे (ता.संगमनेर) येथे घडला आहे. याबाबत ग्रामस्थांच्यावतीने अण्णासाहेब काळे यांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देत सदर प्रकरणाची चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, झोळे येथील १४ मिळकती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे असून, भोगवटादार म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नाव आहे. या जमिनीलगतच शाळेची इमारत असून, मोकळ्या जागेचा विद्यार्थी वर्षानुवर्षे मैदान म्हणून वापर करत आहे. या जागेवर शाळेचे विविध कार्यक्रम व क्रीडा प्रकार होत असतात.
परंतु, सरपंच व ग्रामसेवकाने अधिकाराचा गैरवापर करुन ही जागा ग्रामविकास विद्यालयास दिली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला हरताळ फासल्याचे स्पष्ट होत आहे. गावकर्यांच्या सार्वजनिक वापरातील जमिनी कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा संघटनेला प्रयोजनार्थ मंजूर करण्यात येत नाही. तरी देखील नियमबाह्य पद्धतीने ही मालमत्ता सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामविकास विद्यालयाला दिली आहे. याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने अण्णासाहेब काळे यांनी केली आहे.