अकोल्यात नागरिकांचा मुक्त संचार तर राजूरमध्ये कडकडीत जनता संचारबंदी

अकोल्यात नागरिकांचा मुक्त संचार तर राजूरमध्ये कडकडीत जनता संचारबंदी
आजी-माजी आमदारांमध्येही जनता संचारबंदीवरुन शीतयुद्ध; बाधितांच्या संख्येत मात्र रोज वाढ
नायक वृत्तसेवा, अकोले
देशभरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तालुक्यांत नागरिकांनी ‘जनता संचारबंदी’चा निर्णय घेतला आहे. यास काही ठिकाणी व्यापारी आणि राजकीय व्यक्तींकडून विरोध होत आहे. तर नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. परंतु अकोले शहरात व्यापार्‍यांकडून प्रतिसाद मिळत असताना नागरिक मात्र वाहनांद्वारे फिरताना आढळून येत आहेत. तर राजूरमध्ये जनता संचारबंदीला नागरिकांसह व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.


अकोले शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या बैठकीत सोमवार, 14 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत जनता संचारबंदी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यास व्यापारी असोसिएशनने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला, फळे व किराणा दुकानदारांना सूट दिलेली नाही. मात्र तरी देखील शहरात नागरिकांची वर्दळ सुरू असल्याने कोरोनाची साखळी तुटणार का? असा सवाल व्यापार्‍यांसह सूज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे. त्यातच आजी व माजी आमदारांमध्ये जनता संचारबंदीवरुन संघर्ष उडत आहे. आजी आमदार डॉ.किरण लहामटे हे जनता संचारबंदीच्या विरोधात तर माजी आमदार वैभव पिचड हे समर्थनात आहेत. आरोग्य सुविधा, औषधोपचार, तपासणी वाढविण्यासाठी बंद करुन समाजाचे भले होणार नसल्याची भूमिका आमदार लहामटे यांनी मांडली असून, तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी उद्योजक, व्यावसायिकांकडून अर्थसाहाय्य मिळविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


तर दुसरीकडे माजी आमदार पिचड यांनी थेट याच्याविरोधात भूमिका घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना संकट चालू आहे. यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांचा उदरनिर्वाह होणे कठीण झाले आहे. छोटे-मोठे व्यावसायिकही आर्थिक विवंचनेत पडलेले आहेत. त्यासाठी जनता संचारबंदीची गरज नसून नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह आरोग्याच्या सुविधा वाढविणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. मात्र, दोघांच्या संघर्षात प्रशासन आणि नागरिकांची चांगलीच गोची होत असल्याचे अधोरेखित होत आहे. याचा परिणाम अकोले शहरातील जनता संचारबंदीला व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर नागरिकांचा मुक्त संचार दिसून येत आहे.

आदिवासीबहुल भागातील गावांची राजूर ही मुख्य बाजारपेठ आहे. परंतु येथेही व्यापार्‍यांसह नागरिकांनी एकत्रितपणे निर्णय घेत बुधवार, 16 सप्टेंबरपासून 23 सप्टेंबर जनता संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने जनता संचारबंदी यशस्वी होत असल्याची चिन्हे दिसत आहे. एखादा अपवाद वगळता नागरिकांचा संचार होत नसल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही सरपंच गणपत देशमुख यांनी व्यक्त करत ग्रामपंचायतने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेऊन निर्जंतुकीकरणासाठी पावले उचलली असल्याचे सांगितले.


अवघ्या जगभर धुमाकूळ घालणार्‍या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडताना नेहमी नाका-तोंडावर मास्क अथवा रुमाल, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन लक्षणे दिसल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *