आपण असे अनेक मागासवर्गीय नेते कामाला लावले! अकोल्याच्या पोलीस निरीक्षकांची धमकी; भाजप दलित आघाडीच्या शहराध्यक्षांची तक्रार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुन्हेगारी, चोर्या, हाणामार्या आणि विस्कळीतपणा यामुळे नेहमीच चर्चेत राहणार्या अकोले पोलीस ठाण्याच्या कारकीर्दीत आणखी एका धक्कादायक प्रकाराची नोंद झाली आहे. या घटनेत ब्राह्मणवाड्यातील नातेवाईकांची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या संगमनेरच्या भाजप दलित आघाडीच्या शहराध्यक्षांनाच अकोल्याचे पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांनी ‘दमात’ घेतले. शहराध्यक्ष विकास जाधव यांनी केवळ ‘तक्रार दाखल करुन घ्या’ इतका शब्द उच्चारताच पारा चढलेल्या पोलीस निरीक्षकांनी ‘तु कोण आला मोठा शहाणा?, मला कायदा शिकवू नकोस, नाहीतर तुझ्या गां** पाय घालून टाकील. तु असशील मागासवर्गीय नेता, मला काही घेणंदेणं नाही. तुझ्यासारखेे अनेक नेते मी कामाला लावले आहेत..’ अशा गर्जना करीत तक्रारदारांना तब्बल सहातास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. या अपमानजनक वागणुकीबाबत जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
याबाबत भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती दलित आघाडीचे शहराध्यक्ष विकास जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवारी (ता.1) जाधव यांच्या ब्राह्मणवाड्यातील सासरवाडीकडील नातेवाईकांची भांडणे झाली होती. ती सोडवण्यासाठी ते तेथे गेले. त्यावेळी अकोल्याचे पोलीस निरीक्षक गुलाब पाटीलही तेथे हजर होते. यावेळी जाधव यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांना ‘आमची तक्रार दाखल करुन घ्या’ अशी विनंती केली. मात्र त्याचाही राग आल्याने पोलीस निरीक्षकांचा पारा चढला आणि त्यांनी थेट जाधव यांनाच शिवीगाळ, धमकी आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली.
यावेळी निरीक्षक पाटील यांनी जाधव यांना दमदाटी करताना; ‘तु कोण मोठा शहाणा आलास?, इथे अजिबात थांबायचे नाही. तु आम्हाला कायदा शिकवू नकोस. तुझ्या गां** पाय घालून टाकील. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करील. मला पाटील म्हणतात पाटील, माझ्या नादाला लागू नकोस. तु असशील मागासवर्गीय समाजाचा नेता, मला त्याचे काही घेणंदेणं नाही. तुझ्यासारखे अनेक मागासवर्गीय समाजाचे नेते मी कामाला लावले आहेत..’ असे म्हणत त्यांनी शिवीगाळ आणि दमबाजीही केली.
या उपरांतही त्याकडे दुर्लक्ष करीत दुपारी तीनच्या सुमारास विकास जाधव त्यांच्या नातेवाईकांसह अकोले पोलीस ठाण्यात गेले. मात्र त्यांची कोणीही दखल घेण्यास तयार होत नव्हते. या दरम्यान जाधव यांनी पाटीलकी मिरवणार्या पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, तुम्हाला गपगुमान बसता येत असेल तर बसा, नाहीतर येथून निघून जा. समोरची ‘पार्टी’ आल्याशिवाय कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकीही भरली. तब्बल सहा तासांनंतर रात्री नऊच्या सुमारास समोरची पार्टीही पोलीस ठाण्यात आली.
यावेळी विकास जाधव यांच्या मते आरोपी असलेल्या समोरच्या मंडळीची पोलीस निरीक्षकांनी चांगलीच बडदास्त ठेवताना त्यांना बसण्यासाठी खुर्च्या दिल्या, मात्र त्याचवेळी कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी हजर असलेल्या फिर्यादींना मात्र जमिनीवर बसवण्यात आले. हा सगळा प्रकार आणि पोलीस निरीक्षकांची अरेरावी यामुळे आपण व्यथीत झालो असून मागासवर्गीय असल्यानेच आपणास अशाप्रकारची वागणूक देण्यात आल्याचा गंभीर आरोपही विकास जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकार्यांना दिलेल्या तक्रार अर्जातून केला आहे. अतिशय मुजोर असलेल्या या अधिकार्यावर दोन दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास आपण संगमनेरच्या प्रशासकीय भवनासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेने अकोले पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले असून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्यांना अशाप्रकारे वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसांचे काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. अकोल्याचे आमदार किरण लहामटे अजित पवारांसोबत गेल्याने एकप्रकारे अकोल्यात महायुतीचेच वर्चस्व आहे. अशाही स्थितीत अकोल्याचे पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांचे मागासवर्गीय समाजातील आणि त्यातही सत्ताधारी भाजपच्या दलित आघाडीचे शहराध्यक्ष असलेल्या व्यक्तिला अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया समोर येत असून संगमनेरचे उपविभागीय अधिकारी त्यांच्याबाबत काय अहवाल सादर करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.