सलग दुसऱ्या दिवशीही तालुक्यात कोविडचा उद्रेक..! एकोणाविसावे शतक ओलांडीत तालुका पोहोचला दुसऱ्या सहस्त्रकाच्या उंबऱ्यात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड बाधितांच्या वाढत्या संख्येने संगमनेर तालुक्याला दररोज मोठे धक्के बसत आहेत. शुक्रवारी एकाचवेळी 80 संक्रमित रुग्ण समोर आल्यानंतर आजच्या शनिवारनेही कालचाच कित्ता गिरवला आहे. आजही तालुक्याच्या संख्येत 66 रुग्णांची भर पडली असून तालुक्याने रुग्ण संख्येचे एकोणविसावे शतक ओलांडीत 1 हजार 961 रुग्णसंख्या गाठली आहे. यात शहरातील अवघ्या 15 तर तालुक्यातील 51 रुग्णांचा समावेश आहे. आज खासगी प्रयोगशाळेतील 21 तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 45 रुग्णांची भर पडली. यात शहरातील अवघ्या पंधरा रुग्णांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत जलदगतीने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. बकरी ईद, रक्षाबंधन, स्वातंत्र्यौत्सव, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव आणि मोहरम अशा सणांची भरणार असलेल्या ऑगस्टच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात तालुक्यातील कोविडची स्थिती प्रति दिवस सरासरी 26 रुग्ण अशी होती. दुसऱ्या पंधरवड्यात त्यात पाच टक्क्यांची भर पडून रुग्णवाढीचा दर सरासरी प्रति दिवस 31 रुग्णांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे 31 जुलै रोजी 759 वर असणारी तालुक्याची रुग्णसंख्या ऑगस्ट महिन्यातील 31 दिवसांमध्ये 961 ने वाढून 1 हजार 720 वर जाऊन पोहोचली.
उत्सवांचा महिना असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढली असावी असा काहीसा अंदाज बांधून संगमनेरकर नूतन महिन्यात आशावादी असताना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी माळीवाडा परिसरातील 70 वर्षीय इसमाच्या मृत्यू सोबतच तालुक्याच्या रूग्णसंख्येत 42 रुग्णांची भर पडली, 2 सप्टेंबरला त्यात आणखी 37 रुग्णांची भर पडली तर तीन सप्टेंबरला मालदाड येथील 35 वर्षीय उमद्या छायाचित्रकाराच्या मृत्यू बरोबरच तालुक्याच्या रुग्णसंख्येत सोळा नवीन रुग्णांची भर पडली. सलग दोन दिवस मोठी रुग्णसंख्या समोर आल्याने काहीशा दहशतीत आलेल्या संगमनेरकरांना कमी झालेल्या रुग्णसंख्येतून थोडाबहुत दिलासा मिळाला, मात्र तो चोवीस तासांपेक्षा अधिक काळ टिकू शकला नाही.
कालच्या शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चंदनापुरी येथील 38 वर्षीय तरुणाचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू होण्यासोबतच संगमनेरच्या कोविड इतिहासात तिसऱ्यांंदा तब्बल 80 रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली. या महिन्यात सुरुवातीच्या अवघ्या चारच दिवसात तालुक्याची रुग्णसंख्या सरासरी प्रतिदिन 43.75 दराने तब्बल 175 ने वाढल्याने तालुका एकोणाविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जाऊन 1 हजार 895 वर थांबला. काल राहिलेले काम आजच्या शनिवारने साधले असून, आजही तालुक्याच्या रूग्ण संख्येत तब्बल 66 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याने एकोणाविसावे शतक ओलांडीत 1 हजार 961 रुग्णसंख्या गाठली असून तालुका आता दुसऱ्या सहस्रकाच्या दिशेने अग्रेसर झाला आहे.
आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील बाजारपेठेतील 70 व 42 वर्षीय इसमासह 42 व 38 वर्षीय महिला, 14 वर्षीय तरुणी तसेच सात वर्षीय बालक, साईबन वसाहतीतील 25 वर्षीय तरुण, एस.टी वसाहतीतील तीस वर्षीय महिला, लालतारा कामगार सोसायटीतील 45 वर्षीय तरुण, मालदाड रोड परिसरातील 39 वर्षीय तरुण, रंगारगल्लीतील 19 वर्षीय तरुणी व 85 वर्षीय वयोवृद्ध महिला, इंदिरानगर परिसरातील एकोणपन्नास वर्षीय पुरुष, जनतानगर परिसरातील 59 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण व चंद्रशेखर चौकातील 22 वर्षीय तरुणी अशा पंधरा जणांचा समावेश आहे.
तर आज तालुक्याच्या रुग्ण संख्येतही तब्बल 51 रुग्णांची भर पडली असून कौठे धांदरफळ मध्ये कोविडचा उद्रेक झाला आहे. तेथील 55 व 32 वर्षीय महिलांसह 34 वर्षीय तरुण 11, 8, 9 व 7 वर्षीय मुले, घुलेवाडीतील 33 वर्षीय महिला, मंगळापुर येथील अकरा वर्षीय बालिका, रायते येथील 41 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द मधील 18 वर्षीय तरुणीसह 15 वर्षीय बालक, दाढ खुर्द मधून 48 व 26 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 63 वर्षीय पुरुषांसह 48 वर्षीय महिला, रहिमपूर मधील 27 वर्षीय तरुणांसह पाच वर्षीय बालक, कुरकुटवाडीतील 80 वर्षीय वयोवृद्ध, माळवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 21 वर्षीय तरुण, कवठे बुद्रुक मधील 54 वर्षीय पुरुष,
रायतेवाडीतील 65 वर्षीय महिला, चोरकवठे येथील 67 वर्षीय महिला, कवठे कमळेश्वर मधील 26 वर्षीय तरुण, कौठे बुद्रुक मधील 55 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला परिसरातील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडीतील 40 वर्षीय तरुण, निमोण मधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 36 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, वाघापूर मधील पन्नास वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, रायतेवाडीतील 52 वर्षीय इसम, गोल्डन सिटीतील एकूण 70 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला, पंधरा वर्षीय बालिका व पंधरा वर्षीय बालक, गुंजाळवाडीतील 58 वर्षीय महिला व 40 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 52 वर्षीय इसम,
कवठे धांदरफळ मधील 57 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 80 वर्षीय महिला, वडगाव पान मधील तेहतीस व 38 वर्षीय तरुण, चंदनापुरीतील 45 वर्षीय महिला, मनोली येथील 72 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय इसम, खराडीतील 28 वर्षीय तरुण, चंदनापुरीतील 52 वर्षीय महिलेसह गुंजाळवाडीतील 41 वर्षीय महिला असे एकूण सहासष्ट जणांचे अहवाल आज पॉझिटिव आले असून तालुक्याची रुग्णसंख्या एकोणाविसावे शतक ओलांडून 1 हजार 961 वर पोहोचली आहे.