संगमनेरसह जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील रुग्णसंख्येला लागली ओहोटी! पाथर्डी, अकोले, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील सरासरी रुग्णगती मात्र वाढली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
फेब्रुवारीच्या मध्यापासून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्‍या कोविड संक्रमणाला गेल्या नऊ दिवसांतील आकडेवारीतून ओहोटी लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांच्या तुलनेत नंतरच्या नऊ दिवसांतील आकडेवारीतून काहीसे दिलासादायक चित्र समोर आले असून जिल्ह्याच्या सरासरी रुग्णसंख्येतही तब्बल 910 रुग्णांची दैनिक घट झाली आहे. संगमनेर तालुक्यातील सरासरी रुग्णवाढही तब्बल 51 रुग्णांनी कमी झाली असून सर्वाधिक रुग्ण समोर येणार्‍या अहमदनगर महापालिका क्षेत्रातील सरासरीही तब्बल 362 रुग्ण प्रतिदिवसाने खालावली आहे. मात्र जिल्ह्यातील पाथर्डीसह अकोले, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील सरासरीत कमी अधिक प्रमाणात वाढ झाली असून जिल्ह्याच्या सरासरीला ओहोटी लागलेली असतांना पाथर्डी व अकोले तालुक्याच्या सरासरीत झालेली दुहेरी वाढ चिंता निर्माण करणारी आहे.

एप्रिलमध्ये जिल्ह्याला संक्रमणाच्या सर्वोच्च पातळीवर नेणार्‍या कोविडने महिन्यातील अवघ्या तीस दिवसांतच जिल्ह्यात दररोज तब्बल 2 हजार 671 रुग्ण या सरासरीने 80 हजार 134 रुग्णांची भर पडली. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत जिल्ह्याच्या सरासरीत मोठी वाढ होवून दररोज 3 हजार 833 रुग्ण या गतीने तब्बल 38 हजार 334 रुग्णांची भर पडली. मात्र गेल्या नऊ दिवसांत त्यात जवळपास 24 टक्के घट होवून आजच्या स्थितीत जिल्ह्यात सरासरी 2 हजार 923 रुग्ण रोज या गतीने 26 हजार 306 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णवाढ होणार्‍या अहमदनगर महापालिका क्षेत्रालाही गेल्या नऊ दिवसांतील घटत्या सरासरीने मोठा दिलासा दिला असून सुरुवातीच्या दहा दिवसातील सरासरी 572 रुग्ण दररोज या गतीत मोठी घट होवून ती आता सरासरी 210 रुग्ण या गतीवर येवून स्थिरावली आहे.

चालू महिन्यातील पहिल्या दहा दिवसांत संगमनेर तालुक्यातून सरासरी 354 रुग्ण या गतीने तब्बल 3 हजार 528 रुग्णांची वाढ झाली. नंतरच्या अवघ्या नऊच दिवसांत मात्र त्यात समाधानकारक घट होवून आजच्या स्थितीत तालुक्याची सरासरी 51 रुग्णांनी कमी होवून 303 रुग्णांवर येवून तालुक्यातील 2 हजार 727 रुग्ण समोर आले आहेत. नगर ग्रामीण खेत्रातील रुग्णगतीतही गेल्या नऊ दिवसांत तब्बल 102 रुग्ण प्रतिदिवसाचे अंतर कमी झाले असून या क्षेत्रातील सरासरी 369 रुग्णांवरुन आता 267 रुग्णांवर आली आहे. एप्रिलमध्ये रुग्णसंख्येचा फुगवटा व्हावा त्याप्रमाणे राहाता तालुक्यात अचानक कोविड संक्रमणाने गती घेतली होती. या तालुक्यातील रोजच्या संक्रमणाच्या आकड्यातून चिंजाजनक स्थितीही निर्माण झाली होती. राहाता तालुक्यात मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सरासरी 276 रुग्ण या गतीने 2 हजार 762 रुग्णांची भर पडली होती. नंतरच्या नऊ दिवसांनी मात्र राहाता तालुक्यातील संक्रमणाला एकसारखी ओहोटी लागल्याचे चित्र दाखवतांना सरासरी तब्बल 98 रुग्णांनी कमी झाली. आजच्या स्थितीत तालुक्यातून 178 रुग्ण रोज या गतीने गेल्या नऊ दिवसांत 1 हजार 600 रुग्णांची वाढ झाली आहे.

राहात्या पाठोपाठ श्रीगोंदा तालुक्यातही आश्चर्यकारकपणे संक्रमणाला अचानक वेग आला होता. एप्रिलमध्ये सरासरी 98 रुग्णगती असलेल्या या तालुक्यात मे महिन्याच्या पहिल्या दिवसांत अचानक मोठी वाढ होवून ती 249 रुग्ण प्रतिदिवस या गतीवर पोहोचून तालुक्यात 2 हजार 488 रुग्णांची भर पडली होती. मागील नऊ दिवसांत मात्र त्यात मोठी घट झाली असून सध्या श्रीगोंदा तालुक्यातून 156 रुग्ण या सरासरीने 1 हजार 405 रुग्ण वाढले आहेत. कोपरगाव तालुक्याच्या सरासरीत 47 रुग्ण, राहुरी तालुक्याच्या सरासरीत 46 रुग्ण, पारनेर तालुक्याच्या सरासरीत 43 रुग्ण, शेवगाव तालुक्याच्या सरारीत 20 रुग्ण, जामखेड तालुक्याच्या सरासरीत 19 रुग्ण तर कर्जत तालुक्याच्या सरासरीत 16 रुग्ण दररोज कमी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील दहा तालुक्यांना संक्रमणापासून काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

एकीकडे जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यातील संक्रमणात घट होताना चार तालुक्यातील सरासरी रुग्णगती मात्र भरात आल्याचे चिंताजनक चित्रही समोर आले आहे. त्यात पाथर्डी तालुक्यात एप्रिलमध्ये सरासरी 114 रुग्ण या गतीने 3 हजार 411 रुग्ण समोर आले होते. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत त्यात मोठी वाढ होवून सरासरी 158 रुग्णांवर जावून तालुक्यात 1 हजार 585 रुग्ण वाढले, तर नंतरच्या नऊ दिवसांत त्यात आणखी वाढ होवून सरासरी 198 रुग्ण या गतीने तालुक्यात 1 हजार 787 रुग्णांची भर पडली. पहिल्या दहा दिवसांच्या तुलनेत ही सरासरी प्रतिदिवस चाळीस रुग्णांनी अधिक आहे. अकोले तालुक्यातही दुहेरी आकड्यात संक्रमणाची गती वाढली असून पहिल्या दहा दिवसांतील सरासरी 204 रुग्ण या गतीने 1 हजार 839 रुग्ण वाढलेल्या अकोल्यात नंतरच्या नऊ दिवसांतच सरासरी 215 या गतीने तब्बल 1 हजार 934 रुग्णांची भर पडली आहे. यासोबतच श्रीरामपूर तालुक्यातील सरासरी रुग्णगती 196 वरुन 199 वर तर नेवासा तालुक्यातील सरासरी रुग्णगती 202 वरुन 204 वर गेली आहे. जिल्ह्याच्या संक्रमणाला एकीकडे ओहोटी लागल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे या चार तालुक्यातील सरासरी वाढत असल्याने जिल्हावासियांच्या चिंता मात्र कायम आहेत.

संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीत काहीशी घट झाली असली तरीही कोविडचा धोका मात्र कायम आहे. तालुक्यात सध्या 1 हजार 969 रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यातील 1 हजार 322 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील 58 रुग्ण कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटीलेटर), 669 रुग्ण अतिदक्षता विभागात, 605 रुग्ण ऑक्सिजनच्या सुविधेवर तर 600 रुग्ण विलगीकरणात उपचार घेत आहेत. याशिवाय 37 जणांना गृहविलगीकरणात राहण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 699 तर शहरी भागातील 270 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्याचा पॉझिटिव्ह दर 23.70 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 89.77 टक्के आहे. आत्तापर्यंत सरासरी 0.49 टक्के दराने तालुक्यातील 99 जणांचा बळी गेला आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116777

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *