बोरबनच्या द्राक्षांची दुबईकरांना लागली गोडी…! आनंदा गाडेकरांच्या प्रयोगशील शेतीतून तरुण शेतकर्यांना मिळतेय प्रेरणा..
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याचा पठारभाग म्हटला तर कायमच निसर्गाची वक्रदृष्टी असाणारा प्रदेश. त्यातही शेतीवर एकामागोमाग संकटे येवूनही प्रयोगशील शेती करत बोरबन येथील आनंदा उर्फ नाना नाथा गाडेकर यांनी जम्बो सीडलेस (काळा रंग) जातीच्या द्राक्ष बागा फुलविल्या आहेत. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असून दुबईकरांना चांगलीच गोडी लागली आहे. तेथील बाजारपेठेत हा माल पाठविला जात असून एका किलोला साठ ते सत्तर रूपयांचा भाव मिळत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक गाडेकर यांना कोरोना संकटात आर्थिक दिलासा मिळाला आहे.
बोरबन येथील शेतकरी आनंदा गाडेकर यांच्या आठ एकरवर द्राक्षबागा आहेत. उपलब्ध शेती संसाधनांच्या जोरावर त्यांनी नानाविध प्रयोग राबवून बागा उत्तमरित्या जोपासल्या आहेत. त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, निसर्गाचा लहरीपणा अशा कठीण परिस्थितीवरही द्राक्ष उत्पादक गाडेकर यांनी मात करुन मोठ्या हिंमतीने बागा फुलविल्या आहेत. सध्या द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू त्यांची थेट परदेशात विक्री होत आहे. उत्तम गुणवत्ता व गोडी असल्याने मोठी मागणी वाढली आहे. दुबईकर तर अक्षरशः मोहात पडले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात माल नाशिकसह दुबईच्या बाजारपेठेत पाठविला जात आहे.
मूळात प्रयोगशील शेतकरी म्हणून आनंदा गाडेकर यांची जिल्ह्यात ओळख आहे. नवनवीन प्रयोग राबवून शेती करत असल्याने अनेक तरुण शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देतात. उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर रासायनिक खतांऐवजी जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर करत असल्याचे उत्पादनाला मोठी मागणी मिळते. तर आर्थिक स्त्रोत उंचावण्यासही मदत होते. याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या शेतीनिष्ठ व कृषीभूषण पुरस्कारांसह विविध संस्थानीही त्यांना गौरविले आहे. यातून अनेक तरुण शेतकर्यांना मागदर्शन मिळण्याबरोबर प्रेरणा मिळत आहे.
मागील वर्षी द्राक्षांना चांगले बाजारभाव मिळाले होते. यंदा मात्र अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळाले नाही. आत्तापर्यंत 50 ते 60 टन माल विक्री केला असून प्रतिकिलो साठ ते सत्तर रुपयांचा भाव मिळत आहे. अजूनही माल काढणी चालू आहे.
– आनंदा गाडेकर (द्राक्ष उत्पादक)