मलिक यांच्या अटकेचा महाविकास आघाडीकडून निषेध संगमनेरात केंद्र सरकार व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आता भाजपाला सर्व प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने केंद्रीय यंत्रणा ईडी व सीबीआयचा दुरुपयोग करत आहे. या कार्यपद्धतीचा आम्ही तीव्र निषेध करत असून मंत्री नवाब मलिक यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. त्यामुळे त्यांना निर्दोष सोडावे अशी एकमुखी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आली.

संगमनेर बसस्थानकासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांच्यावतीने केंद्र सरकार व ईडी या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे जनार्दन आहेर, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, अमर कतारी, प्रशांत वामन, कपिल पवार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, सुरेश झावरे, निखील पापडेजा, सुभाष सांगळे, जावेद शेख, गौरव डोंगरे, सोमेश्वर दिवटे, तात्या कुटे, अफजल शेख, वैशाली राऊत, अजय फटांगरे, हैदर अली, इम्तियाज शेख, किरण घोटेकर, दीपक वाळुंज, अण्णा राहिंज, शरीफ शेख, जीवन पंचारिया आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना इंद्रजित थोरात म्हणाले, महाराष्ट्रात जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे तेव्हापासून भाजपामध्ये अस्वस्थता आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येण्यासाठी ते केंद्रीय यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर करत आहे. नवाब मलिक यांना झालेली अटक ही अत्यंत निषेधार्ह असून ईडीने ह्या कारवाया ताबडतोब थांबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली. तर आबासाहेब थोरात म्हणाले, नवाब मलिक यांनी कायम सत्य भूमिका मांडली. भाजपाच्या खोट्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. म्हणून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई झाली आहे. कोविड काळात महाविकास आघाडी सरकारने सर्वाधिक चांगले काम करूनही पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा संसदेत अपमान केला हे अत्यंत निंदनीय आहे. तातडीने नवाब मलिक यांची सुटका करावी. भाजपा सरकार डरती है ईडीको आगे करती है, बीजेपी हाय हाय हाय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Visits: 10 Today: 1 Total: 114895

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *