भंडारदरा पाणलोटात काजव्यांचे आगमन

नायक वृत्तसेवा, अकोले
भंडारदरा पाणलोटात काजव्यांचे तुरळक प्रमाणात आगमन झाले आहे. या भागात काजव्यांचे आगमन म्हणजे पावसाचा सांगावा असतो असे येथील आदिवासी बांधव सांगतात. काजव्यांचे आगमन झाल्याने यंदाही या भागात मान्सूनचे लवकरच आगमन होईल असा त्यांचा कयास आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर-कळसूबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे, भंडारदरा, चिचोंडी, बारी या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली जातात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भूत खेळ सुरू होतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना वस्ती असते, ती झाडे ख्रिसमस ट्री सारखी दिसतात. हा काजवा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण गतवर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊन असल्याने हा अद्भूत खेळ पाहण्यापासून पर्यटक वंचित राहणार आहेत.

Visits: 43 Today: 1 Total: 425162

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *