धरणांच्या पाणलोटात संततधार; लाभक्षेत्राला मात्र प्रतीक्षा मुळा खोर्‍यात पावसाचा जोर वाढला, मात्र प्रवरा खोर्‍यातील वेग मंदावला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दीर्घकाळ ओढ देणार्‍या वरुणराजाने गेल्या 19 जुलैपासून धरणांच्या पाणलोटात मुक्काम ठोकल्याने पाणीसाठे समाधानकारक स्थितीत पोहोचले आहेत. 15 ऑगस्टपूर्वी भरण्याची परंपरा असलेला भंडारदर्‍याचा जलाशयही 82 टक्के भरल्याने यंदा ही परंपरा अव्याहत राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा जिवंत पाणीसाठाही आता 47 टक्के झाला असून एकूण पाणीसाठा 57 टक्क्यांवर पोहोचला आहे. कळसूबाईच्या डोंगररांगावर मात्र पावसाचा जोर काहीसा मंदावल्याने कृष्णवंतीचा प्रवाह आकसला आहे. मात्र गेल्या चोवीस तासांत कृष्णवंतीच्या 235 दशलक्ष घनफूट पाण्यासह भंडादर्‍यातून सोडलेले 96 दशलक्ष घनफूट पाणी निळवंड्याच्या जलाशयात विसावल्याने या धरणाचा पाणीसाठाही आता 43 टक्के झाला आहे. एकीकडे पाणलोटात संततधार कायम असली तरीही दुसरीकडे मात्र लाभक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्रही गेल्या आठ दिवसांपासून दिसत आहे.

मुळा व प्रवरा नदीच्या खोर्‍यात गेल्या दहा दिवसांपासून वरुणराजाचा मुक्काम असून संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिनही धरणांच्या जलसाठ्यात दररोज बदल होत असून सरासरीनुसार मोठ्या धरणांमधील पाणीसाठे समाधानकारक अवस्थेत पोहोचले आहेत. गेल्या चोवीस तासांत मुळा नदीच्या तुलनेत प्रवरेच्या खोर्‍यातील पाऊस बर्‍याच अंशी मंदावला आहे. त्यामुळे धरणात येणार्‍या नवीन पाण्याचा ओघही आटला आहे. दुसरीकडे मुळा पाणलोटातील हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर मात्र पावसाचा झंझावात वाढल्याने गुरुवारी पहाटे आकसलेल्या मुळानदीने दिवसभरात पुन्हा 10 हजार क्युसेक्सचा वेगवान प्रवाह धारण केला असून धरणात झापाट्याने पाणी दाखल होत आहे.

मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाचा मुक्काम असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच आढळा व भोजापूरसारख्या कमी क्षमतेच्या मध्यम प्रकल्पांना मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा असून आढळा धरण समूहातील तीनपैकी एकही जलाशय अद्याप भरलेला नाही. त्यामुळे आढळा धरणाला अद्यापही नवीन पाण्याची प्रतीक्षा असून आसपासच्या डोंगरांवर कोसळणार्‍या तुरळक आषाढसरींनी गेल्या 1 जूनपासून धरणात 46 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. सद्यस्थितीत आढळा धरणात 505 दशलक्ष घनफूट (47.64 टक्के) पाणी साचले आहे. मागील चोवीस तासांत रतनवाडी येथे 113 मिलीमीटर, घाटघर येथे 102 मिलीमीटर, पांजरे येथे 99 मिलीमीटर, भंडारदर्‍यात 91 मिलीमीटर, वाकी येथे 86 मिलीमीटर, निळवंडे येथे 11 मिलीमीटर व आढळा येथे अवघा तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे.


आज सकाळी सहा वाजेपर्यंत मुळा धरणात 516 दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून पाणीसाठा 14 हजार 625 दशलक्ष घनफूट (56.25 टक्के), भंडारदरा धरणात 428 दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून पाणीसाठा 9 हजार 28 (81.78 टक्के), निळवंडे धरणात 331 दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून पाणीसाठा 3 हजार 546 (42.98 टक्के) व आढळा धरणाचा पाणीसाठा 505 दशलक्ष घनफूट इतका आहे. वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन 1 हजार 22 क्युसेक्सने निळवंडे धरणात तर कोतुळनजीकच्या मुळानदीतून 10 हजार 26 क्युसेक्स वेगाने मुळा धरणात पाणी दाखल होत आहे.

Visits: 113 Today: 2 Total: 1106872

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *