अगस्ति कारखान्याचा ऊस तोडणी हंगाम सुरळीत ः गायकर ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याला सहकार्य करण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति कारखान्याचा सन 2021-22 हा गाळप हंगाम 50 टक्के टप्पा पूर्ण झालेला असून, ऊस तोडणी हंगाम अत्यंत शिस्तबध्द, काटेकोर व सुरळीतपणे सुरु असल्याचा विश्वास अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर यांनी व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती देताना उपाध्यक्ष गायकर म्हणाले, कोणताही साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्याकरिता (ना नफा ना तोटा) ब्रेक इव्हन क्रशिंग होणे व साखरेस उत्पादन खर्चाइतका किंवा त्यापेक्षा जादाचा भाव मिळणे गरजेचे असते. अशावेळी साखरेकरिता उत्पादन खर्चाच्या प्रमाणात विक्री दर मिळावा लागतो. स्टॅन्डर्डप्रमाणे प्रत्यक्षातील गाळप क्षमता गुणिले 160 दिवस प्रमाणे होणारे क्रशिंग केलेस व साखरेकरिता उत्पादन खर्चाचे प्रमाणात विक्री दर मिळाल्यास कारखाना ना नफा ना तोटा तत्वावर चालतो.
याकरीता प्रतिदिनी ऊस गाळप क्षमता 3500 मे. टन गुणिले 160 दिवस प्रमाणे 5 लाख 60 हजार मे. टन गाळप करणे व साखरेकरीता उत्पादन खर्चाचे प्रमाणात विक्री दर मिळणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात गेले 15-20 वर्षात 2.0 ते 3.0 लाख मे. टन ऊस उपलब्ध होता. दुर्गम आदिवासी डोंगराळ विभाग असूनही या गळीताकरीता कारखान्याचे कार्यक्षेत्रात कधी नव्हे एवढा उच्चांकी सुमारे 4.15 मे. टनपर्यंत अधिक ऊस उपलब्ध झालेला आहे. या गळीताकरीता नोंदविलेले ऊस क्षेत्र 4935 हेक्टर होते. त्यापैकी आत्तापर्यंत कार्यक्षेत्रातील 1750 हेक्टरवरील उसाची तोडणी पूर्ण झालेली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत काटेकोरपणे हंगाम सुरु आहे. हंगामाच्या सुरवातीला कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता लक्षात घेवून लवकर व वेळेवर ऊस तोडणी व्हावी म्हणून, कार्यक्षेत्रातील गाळप प्रतिदिन 2500 मे. टन व कार्यक्षेत्राबाहेरील गाळप प्रतिदिन 1000 मे. टन याप्रमाणे करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आलेले होते. मागील वर्षी कार्यक्षेत्रातून फक्त 1300 मे. टन ऊसाचे गाळप करण्यात येत होते. तथापि, संचालक मंडळाने शेतकरी ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेवून कार्यक्षेत्रातील ऊस लवकर तोडण्याच्या सूचना दिल्याप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. प्रत्यक्षात आज रोजी कार्यक्षेत्रातून 2500 मे. टन व कार्यक्षेत्राच्या बाहेरुन 1100 मे.टन प्रतिदिन याप्रमाणे ऊस पुरवठा केला जात असल्याचे गायकर यांनी सांगितले. तरी सभासद शेतकर्यांनी अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये व अगस्ति कारखान्याला सहकार्य करावे असे आवाहनही केले. यावेळी संचालक प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, कचरु शेटे, गुलाबराव शेवाळे, कार्यकारी संचालक अजित देशमुख, ऊस विकास अधिकारी सयाजीराव पोखरकर, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, शेतकी अधिकारी सतीश देशमुख, आसवनी प्रमुख सुरेंद्र थोरात आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.