नववर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा सजला; पर्यटकांवर प्रशासनाची करडी नजर संभाव्य गर्दी आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलीस व वन विभागाची बैठक
नायक वृत्तसेवा, भंडारदरा
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा (ता.अकोले) येथे होणार्या संभाव्य गर्दीवर नियत्रंण मिळविण्यासाठी राजूर पोलीस व वन विभागाच्यावतीने भंडारदरा येथे नुकतीच बैठक संपन्न झाली आहे. यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. यावर प्रशासनाची करडी नजर असल्याचे पर्यटकांना सूचित केले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा हे महत्वाचे निसर्ग पर्यटन स्थळ असून, नववर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा येथे मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी होत असते. पंरतु कोविडच्या कालावधीत भंडारदरा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने दोन वर्षे भंडारदर्यात पर्यटकांची गर्दी झाली नव्हती. यंदा मात्र कोविडचे सर्व नियम पाळून भंडारदरा पर्यटनास परवानगी देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गर्दीवर अंकुश मिळविण्यासाठी राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.
या बैठकीत कापडी तंबूंचे कॅम्पिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण असते, त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी असंख्य पर्यटक या तंबूंमध्ये वास्तव्य करण्यासाठी येतात. मात्र यात वास्तव्यास येणार्या पर्यटकांनी नोंद करणे, ओळखपत्र, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांक आदी तपशील प्रशासनास देणे क्रमप्राप्त केले आहे. याशिवाय रात्री नऊ वाजेनंतर संगीत वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासह कोविड नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारदरा धरणाचे पर्यटन कोविडच्या कालावधीत रोखले गेले होते. त्यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न तयार झाला होता. त्यामुळे दोन्ही विभागांनी रोजगार निर्मितीस प्राधान्य देत प्रत्येक पर्यटकास तंबूमध्ये वास्तव्यासाठी कमीत कमी प्रत्येकी एक हजार रुपये मोजावे लागणार असल्याचे ठरविले. त्यासंदर्भात वन विभागाने एक नियमावली तंबूधारकासांठी ठरवून दिली आहे. यामध्ये दोनवेळा चहा, नाश्ता, जेवण, शेकोटी, संगीत आदी सेवा उपलब्ध असणार आहे.