निकालाआधी गोव्याचे मुख्यमंत्री साईबाबांच्या चरणी! शिवसेनेवर केली बोचरी टीका; ‘पुन्हा’ सत्तेचा विश्वास व्यक्त
नायक वृत्तसेवा, शिर्डी
गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर निकालाआधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे देवदर्शन सुरू आहे. त्यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर ते शनि शिंगणापूर येथे शनिदेवाचे तर पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
साई दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. ‘साईबाबांनी सगळं काही दिलयं. पुन्हा एकदा राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी हीच प्रार्थना साईंबाबांकडे केल्याचे ते म्हणाले. यावेळच्या निवडणुकीत गोव्यात अनेक पक्ष होते. पश्चिम बंगाल दिल्लीहून अनेकजण येऊन गेले. एक प्रयोग करून पाहू यासाठी ते आले असावेत. मात्र गोव्यातील जनता हुशार आहे, त्यामुळे बाहेरच्या पक्षांचा काही फरक पडणार नाही. पुन्हा एकदा भाजपचेच सरकार गोव्यात येईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना सोबत होती, तेव्हाही गोव्यात आमच्या विरोधात असायची. मात्र गोव्यात शिवसेनेचा प्रभाव कधीही दिसला नाही. निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे मोठमोठे नेते येऊन फक्त डरकाळ्या फोडतात, असा टोला त्यांनी शिवसेनेला हाणला. उत्पल पर्रीकर यांनी पणजीत भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यांना पक्षाने अनेक ठिकाणी संधी दिली होती. राष्ट्रीय पक्षाने दिलेली संधी कोणताही कार्यकर्ता नाकारत नाही. पण त्यांनी नाकारली. उत्पल पर्रीकर यांचा प्रभाव फक्त पणजीपुरता मर्यादित आहे. मात्र, तेथेही भाजपचा उमेदवार निवडून येईल असा दावा सावंत यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईबद्दल विचारलं असता ते म्हणाले, कोणत्याही राज्यात तपास यंत्रणा कायद्याचा गैरवापर करत नाहीएत. एखादा व्यक्ती चुकत असेल किंवा काही माहिती मिळाली तरच केंद्रीय तपास यंत्रणा काम करतात.