शहरातील रुग्णालयांमागे लागले रुग्णांच्या नातेवाईकांचे ‘शुक्लकाष्ठ’! संजीवनप्रमाणेच भोलाने हॉस्पिटलवरही प्रसंग गुदरला, मात्र पोलीस निरीक्षकांची शिष्टाई आली फळाला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठारभागातील एका महिलेला पोटाच्या विकारावरील उपचारासाठी संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेपूर्वी संबंधित महिलेला भुलीच्या इंजेक्शनच संसर्ग (इन्फेक्शन) झाल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ बनली. त्यावर संबंधित रुग्णालयाने त्या महिलेला दुसर्या खासगी रुग्णालयात हलविले, तेथे उपचारापूर्वीच त्या महिलेचा रात्री दिड वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याने मयत महिलेच्या गावाकडील मंडळींनी आज सकाळपासूनच नवीन नगर रस्त्यावरील ‘त्या’ खासगी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी डॉक्टर आणि मयतेचे नातेवाईक यांच्यात समन्वय साधून यशस्वी शिष्टाई केल्याने तब्बल नऊ तासांनंतर मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
याबाबत शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पठारावरील साकूर परिसरातील बिरेवाडी येथील संगिता अंकुश पठारे (वय 35) या महिलेला पोटाच्या विकारावरील उपचारांसाठी संगमनेरातील डॉ.राजेश भोलाणे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होतांना संबंधित महिला व्यवस्थित असल्याचे तिचे नातेवाईक सांगतात. तेथे दाखल केल्यानंतर तातडीची शस्त्रक्रिया म्हणून संबंधित डॉक्टरांनी तिला भुलीचे इंजेक्शन दिले. मात्र त्या महिलेला त्याचा संसर्ग झाल्याने ती अत्यवस्थ झाली. त्यामुळे ‘त्या’ डॉक्टरांनी तिला तातडीने रात्री एकच्या सुमारास शहरातील अन्य एका खासगी रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला.
मात्र तेथील वैद्यकीय प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही वार्ता आज सकाळी बिरेवाडीत पसरताच मयतेच्या नातेवाईकांसह अनेकांनी ‘त्या’ खासगी रुग्णालयात गर्दी केली व मृतदेह ताब्याल न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा संतप्त जमाव डॉ.भोलाणे यांच्या रुग्णालयाजवळ आला. यावेळी गर्दीतील अनेकांनी ‘संबंधित डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यानेच रुग्ण दगावल्याचा’ आरोप करीत रोष व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे भोलाणे रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकूंद देशमुख व सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थ केली.
मयताच्या नातेवाईकांच्या भावना समजावून घेतल्यानंतर त्यांनी डॉ.राजेश भोलाणे व त्या दुसर्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली. तो पर्यंत शहरातील अन्य काही डॉक्टर मंडळीही डॉ.भोलाणे यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या रुग्णालयात जमा झाली. सर्वांशी चर्चा करुन, उपचाराची पद्धत आणि रुग्ण दगावण्या मागच्या कारणांची मिमांसा करुन पो.नि.देशमुख यांनी डॉक्टर आणि मयत महिलेच्या जवळच्या नातेवाईकांशी समन्वयातून संवाद साधून दिला. त्यांची ही शिष्टाई फळाला आली आणि तब्बल नऊ तासांच्या विलंबाने मयतेचा मृतदेह ‘त्या’ खासगी रुग्णालयातून पालिकेच्या कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकाराने दोनच दिवसांपूर्वी संगमनेरात घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना पोलिसांनी सुयोग्य प्रकारे परिस्थिती हाताळून मयतेच्या नातेवाईकांना शांत केल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपचारा दरम्यान रुग्ण मृत्यू पावल्याने त्याच्या नातेवाईकांकडून रुग्णालयात धुडगूस घालण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घुलेवाडीतील संजीवन रुग्णालयात घडला. या प्रकरणात दोन्ही बाजूने ‘फ्रि’ स्टाईल झाल्याचीही चर्चा समोर येवून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर आजही तसाच प्रसंद उद्भवला असता. मात्र पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी योग्यवेळी घटनास्थळी धाव घेत मयतेच्या नातेवाईकांच्या शंकांचे निरसन केल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा एकवेळ संजीवन प्रकरणाची पुनरावृत्ती होण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसांत मयत रुग्णाच्या नातेवाईकांकडून असे प्रकार घडू लागल्याने शहरातील रुग्णालयांमागे रुग्णांच्या नातेवाईकांचे ‘शुक्लकाष्ठ’ तर लागले नाही ना अशीही चर्चा शहरात सुरु झाली आहे.