नाकाबंदीवरील घारगाव पोलीस निरीक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न! नाकाबंदी तोडून पळून जाणाऱ्या वाहन चालकाने पोलीस निरीक्षकांच्या अंगावरच वाहन घातले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या दुसऱ्या संक्रमणात बाधित आणि मृतांच्या संख्येसह विविध घटनांनी एकामागून एक धक्के बसत असल्याने संगमनेर तालुक्यातील वातावरण दूषीत झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यातच आज सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी वरील पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्याने घाबरलेल्या वाहनचालकाने घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून ऐनवेळी पाटील यांनी बाजूला उडी घेतल्याने त्यांच्या पायावरून वाहनाचे चाक गेले. त्यामुळे त्यांच्या तळपायाचे हाड मोडले आहे. पोलिसांनी पाठलाग करीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या वाहनासह त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. तर पो. नि.पाटील यांच्यावर घारगावमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने पोलीस वर्तुळासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी घारगाव पोलिसांच्यावतीने आंबी फाट्याजवळ महामार्गवरुन जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी नियमानुसार प्रवास पास, वाहनातील प्रवाशांची संख्या आणि मुखपट्टी आदी गोष्टी पोलिसांकडून तपासल्या जात होत्या. याच दरम्यान नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या मारुती इर्टीगा कंपनीच्या (एम.एच.12/आर.वाय.8568) वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांनी वाहन थांबवण्यास सांगितल्याने घाबरलेल्या वाहनचालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या गडबडीत त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या अंगावरच आपले वाहन घातले. प्रसंगावधान राखून ऐनवेळी पो.नि.पाटील यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरच्या वाहनाचा वेग अधिक असल्याने त्यांचा एक पाय सदरच्या वाहनाच्या चाका खाली सापडला व त्यांच्या तळपायाचे हाड मोडले गेले. यानंतरही सदर वाहन चालकाने आपले वाहन न थांबवता पुण्याच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नाकाबंदीवरील इतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन सदर वाहनासह त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

या घटनेत पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घारगाव मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने नाकाबंदी वरील पोलिसही असुरक्षित असल्याचे समोर आले असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Visits: 160 Today: 1 Total: 1113663
