माजी नगराध्यक्षांसह दोघांविरोधात गुन्हा दाखल शिवजयंतीच्या जागेचा वाद; पोलिसांशी गैरवर्तनाचा ठपका..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीथीनुसार साजर्‍या होत असलेल्या शिवजयंती उत्सवाला जागेच्या कारणावरुन गालबोट लागल्यानंतर आता त्याचे पर्यावसान माजी नगराध्यक्षांसह तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल होण्यात झाले आहे. बुधवारी माध्यान्नाच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात काँग्रेस आणि महायुतीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष विश्‍वास मुर्तडक यांच्यासह दोघांनी पोलिसांसोबत अरेरावी करीत अपशब्द वापरल्याने रात्री उशिराने त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.12) माध्यान्नाच्या सुमारास बसस्थानकाच्या वादग्रस्त जागेत मांडव उभारल्याच्या कारणातून काँग्रेस आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि हमरीतुमरी सुरु झाल्यानंतर काही वेळातच तेथे पोहोचलेल्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तेथे जमलेला जमाव हटवण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलीस कर्मचारी तेथे जमलेल्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जाण्यास सांगत असतानाच सदरचा प्रकार घडला. यावेळी माजी नगराध्यक्ष विश्‍वास मुर्तडक, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे आणि वैष्णव मुर्तडक यांनी कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना उद्देशून अपशब्द वापरले.


या दरम्यान त्यांच्याकडून पोलीस कर्मचार्‍यांना धाकात घेण्याचाही प्रयत्न झाल्याचे हवालदार संजय बढे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहेत. त्यावरुन शहर पोलिसांनी वरील तिघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे, अपशब्द वापरुन शिवीगाळ करणे व धमकावण्याच्या कलमान्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकाराने काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात आला असून सत्तेचा वापर करुन खोट्या तक्रारी दाखल करण्याचे षडयंत्र राबवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Visits: 12 Today: 12 Total: 305221

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *