नेवाशात शनिवारपासून पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू! पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; तर मोकाट फिरणाार्यांची होणार रॅपिड टेस्ट

नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरात मागील महिन्यापासून सातत्याने होणारी कोरोना रुग्णवाढ चिंता वाढवणारी असल्याने ही साखळी तोडण्यासाठी शनिवार दिनांक 15 मे पासून पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी नागरिकांसह व्यापार्यांनी सर्व दुकाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर मोकाट फिरणार्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

मागील वर्षी कोरोनाची महामारी सुरू झाली असताना नेवासा शहरातील अनेक नागरिकांनी व व्यापार्यांनी आपले प्राण गमावले होते. यामध्ये व्यापार्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, मागील महिन्यापासून ही रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असताना देखील शहरात फिरणार्यांची संख्या काही कमी होत नाहीये. म्हणून सर्वांनी मिळून कोरोनाच्या विरोधात लढा उभारण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांच्या हितासाठी घरात राहून जनता कर्फ्यूला पाठिंबा देऊन नेवासकरांनी साथ द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी नागरिकांना केले.

याकाळात फक्त दवाखान्यासह मेडिकल या अत्यावश्यक सेवा चालू राहतील. बाकी सर्व दुकाने बंद राहणार असून गावाच्या हिताच्या दृष्टीने नागरिक व व्यापार्यांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सतीश पिंपळे यांनी केले आहे. तसेच या कालावधीत शहरात विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करून तो व्यक्ती जर पॉझिटिव्ह आला तर त्यांची रवानगी कोविड सेंटर येथे केली जाईल. तर या काळात दुकाने उघडल्यास दुकानांवरही कडक कारवाई केली जाईल असा इशारा नगरपंचायतचे अधिकारी रवींद्रकुमार गुप्ता यांनी दिला आहे.
