सन्मान करण्याच्या दिवशीच ‘परिचारिकांना’ शिर्डी पोलिसांनी घेतले ताब्यात! सनदशीर मार्गाने ‘समान काम-समान वेतन’ मागणार्या आरोग्य कर्मचार्यांवर साईबाबा संस्थानची दडपशाही
![]()
नायक वृत्तसेवा, शिर्डी
‘श्रद्धा आणि सबुरी’चा मंत्र देणार्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात मागील एका तपाहून अधिक काळापासून निस्पृह सेवा देणार्या सुमारे अडीचशे परिचारिकांसह आरोग्य कर्मचार्यांना आज जागतिक परिचारिका दिनीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाने चर्चेद्वारे मुद्दा सोडविण्याऐवजी पोलीस बळाचा वापर करुन आपल्याच कर्मचार्यांविरोधात दडपशाही केल्याने शिर्डीतून संताप व्यक्त होत आहे. अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करणार्या या कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांनी दडपशाही झाली तरीही कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा मानस यावेळी जाहीर केला आहे.

शिर्डी म्हणजे श्री साईबाबांच्या पुण्यकर्माने पावन झालेली नगरी. शिर्डीत श्री साईबाबा संस्थानच्यावतीने रुग्णालय चालविले जाते. या रुग्णालयात गेल्या 12 ते 15 वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर सुमारे अडीचशेहून अधिक परिचारिका, परिचारक व आरोग्य कर्मचारी काम करतात. मागील वर्षी ‘समान काम-समान वेतन’ या मुद्द्यावरुन या कर्मचार्यांनी आंदोलनही केले होते. त्यावेळी संस्थानच्या व्यवस्थापनाने कर्मचार्यांच्या मागण्या मान्यही केल्या होत्या. मात्र त्यानंतर देशासह जिल्ह्यातही कोविडचे संक्रमण सुरू झाल्याने शिर्डीतील संस्थानच्या रुग्णालयात कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. येथे इमाने-इतबारे काम करुनही मोबादला मिळत नसल्याने सनदशीर मार्गाने मागणी पूर्ण करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे.

वर्षभराआधी तुमच्या मागण्या मान्य करू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे परिचारिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. यात डॉक्टर्सपेक्षा रुग्णांसोबत काम करणार्या परिचारिकांवर जास्त जबाबदारी असते. पण असं असूनही ज्या सुविधा डॉक्टरांना मिळतात त्या परिचारिकांना मिळत नाहीत. त्यामुळे समान काम, समान वेतन, कुटुंबियांना मदत अशा अनेक मागण्यांसाठी परिचारिका आंदोलन करत आहेत.

दरम्यान, मागील वर्षीही अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आलं होतं. पण त्यावर काही निर्णय घेण्यात आला नाही. आताही पोलिसांकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे आजच्या दिनीतरी या परिचारिकांना न्याय मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

