राम मंदिरासाठी आहुती दिलेल्यांचा इतिहास पुन्हा जागा होईल : डॉ.मालपाणी श्रीराम मंदिरासाठी निधी संकलनाच्या केंद्राचे संगमनेरात उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीतून देशाला एकसंघ ठेवणारी युवापिढी घडेल आणि त्या माध्यमातून देशात राष्ट्रमंदिर निर्माण होईल. आपली सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासोबतच श्रीराम मंदिर उभारणीसाठी ज्या कारसेवकांनी आणि श्रीरामभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांचे स्मरण होईल व पुढील पिढ्यांना त्यांचा इतिहास समजावा हा मुख्य उद्देश हे राष्ट्रमंदिर उभे करतांना आपल्या सर्वांच्या समोर असणार आहे. या कार्यात आपल्या प्रत्येकाचा खारीचा वाटा असायलाच हवा असे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय योग फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी केले आहे.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर उभ्या राहत असलेल्या श्रीराम मंदिराच्या कामात देशातील रामभक्तांचा वाटा असावा यासाठी घराघरातून धन संकलन केले जाणार आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मकर संक्रांतीपासून या कार्याला सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी रविवारी (ता.3) संघाच्या संगमनेर कार्यालयाच्या परिसर ‘श्रीराम जन्मभूमी धनसंकलन केंद्रा’चे डॉ.मालपाणी यांच्या हस्ते व प्रा.सोपानराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.मालपाणी बोलत होते. संपूर्ण देशभरात येत्या 15 ते 31 जानेवारीपर्यंत चालणार्या या अभियानातून देशातील 4 लाख गावांमधील 11 कोटी कुटुंबापर्यंत कार्यकर्ते पोहोचणार आहेत.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा.देशमुख म्हणाले की, जोपर्यंत या देशामध्ये श्रीराम मंदिरासाठी प्राण दिलेल्या असंख्य लोकांच्या विचारांची पिढी ज्नम घेत नाही, तोपर्यंत या देशातील हिंदुत्त्व कधीही मरणार नाही. श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी राबविल्या जाणार्या या अभियानातून केवळ निधी संकलनच नव्हेतर देशातील प्रत्येक घर श्रीराम मंदिराशी जोडण्याचा संकल्पही तडीला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
या अभियानासाठी देशभरासह संगमनेरातही श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण ट्रस्टच्यावतीने समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या देखरेखीखाली संपूर्ण तालुक्यातून निधी संकलन व जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ रविवारी कार्यालयाच्या उद्घाटनाने झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक कोथमिरे यांनी केले. संघाचे सहसंघचालक सुभाष कोथमिरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी तर आभार विशाल वाकचौरे यांनी मानले.
सुमारे अकराशे कोटी रुपये खर्च करुन अयोध्येतील शरयुकाठी उभारण्यात येणार्या श्रीराम मंदिरासाठी घराघरातून निधी संकलन व्हावे या हेतूने मकरसंक्रांतीपासून संपर्क व संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते पंधरा दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील अधिकाधिक श्रीरामभक्तांशी संपर्क साधून प्रत्येकी किमान 10 रुपये निधी जमा करणार आहेत. या राष्ट्रमंदिर उभारणीत आपलाही हातभार लागावा यासाठी तालुक्यातील अधिकाधिक भाविकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.