संगमनेर तालुक्यातील साडेनऊशे रुग्णांना लागतोय ‘ऑक्सिजन’! दुसर्या लाटेत संपूर्ण तालुका झाला संक्रमित; मात्र रुग्ण बरे होण्याचा तालुक्याचा दर सर्वोच्च..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्याभरापासून उंचावलेली तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या अद्यापही दिड हजारांच्या पल्याडच असल्याने तालुक्यात अजूनही रुग्णांना ऑक्सिजनच्या खाटा मिळविण्यासाठी शर्थ करावी लागत आहे. त्यातच दररोज समोर येणार्या रुग्णसंख्येतूनही अद्याप तालुक्याला दिलासा मिळालेला नसल्याने एकीकडे समोर येणारे रुग्ण तर दुसरीकडे रुग्णालयातील खाटा शोधणारे त्यांचे नातेवाईक असे दृष्य अद्यापही सर्वत्र दिसत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेतून संक्रमणापासून दूर राहीलेल्या गावांमध्ये दुसर्या लाटेतील संसर्ग पोहोचल्याने सद्यस्थितीत संपूर्ण तालुकाच कोविडमय झाला आहे, मात्र त्याचवेळी किंचितसा दिलासाही मिळाला असून तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा वेग आता जिल्ह्यात सर्वोच्च 90.94 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आजच्या बरोबर वर्षापूर्वी संगमनेर तालुक्यात महिन्याभरात सरासरी अवघ्या 1.16 या गतीने 36 रुग्ण समोर आले होते. मात्र एका वर्षातच कोविडने संपूर्ण देशासह तालुक्यातही सर्वदूर पाय पसरले आणि आजच्या स्थितीत तालुक्याला रुग्णसंख्येच्या शिखरावर नेवून बसविले आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या तुलनेत सध्याच्या कोविड प्रसाराचा वेग 255 पट अधिक आहे. विशेष म्हणजे पहिल्या संक्रमणातही तालुक्यातील सात गावं आणि वाड्या-वस्त्या कोविड मुक्त होते, दुसर्या संक्रमणाने मात्र सर्व अडथळे ओलांडून संपूर्ण तालुकाच बाधित केला असून आजच्या स्थितीत तालुक्यातील शंभर टक्के गावांमध्ये कोविडचे संक्रमण पोहोचले आहे. आजवर तालुक्यातील 174 गावे आणि वाड्या-वस्त्यामिळून 18 हजार 255 रुग्ण समोर आले असून त्यातील 1 हजार 559 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.
फेब्रुवारीत कोविडच्या गतीला वेग आल्यानंतर स्थानिक प्रशासनासने टप्प्याटप्प्याने खासगी रुग्णालयांना ‘डिसीएचसी’ची परवानगी देत आजअखेर 46 खासगी कोविड रुग्णालये सुरु केली आहेत. या व्यतिरीक्त घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात व संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयातही कोविड बाधितांवरील उपचार सुरु आहेत. आजच्या स्थितीत ग्रामीण भागातील 1 हजार 242 तर शहरी भागातील 317 अशा एकूण 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 59 रुग्ण कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) तर 327 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. याशिवाय तालुक्यातील 631 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे तालुक्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 958 आहे.
याशिवाय लक्षणे नसूनही पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचीही मोठी संख्या असून आजच्या स्थितीत तालुक्यातील 532 रुग्णांना विविध ठिकाणच्या कोविड केअर सेंटर्समध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच कोविड नियमांचे पालन करुन आपल्या कुटुंबाचे व उपचार करणार्या डॉक्टरांचे हमीपत्र दिलेले 34 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे उपचारांशिवाय केवळ विलगीकरणात असलेल्या तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्याही आता 601 झाली आहे. शासकीय नोंदीनुसार 1 मार्चपूर्वी म्हणजे कोविड संक्रमणाच्या पहिल्या लाटेतील तब्बल बारा महिन्यात तालुक्यातील 53 जणांचा बळी गेला. तर 1 मार्चनंतर राज्यासह तालुक्यात उसळलेल्या संक्रमणाच्या दुसर्या लाटेत अवघ्या अडिच महिन्यातच 42 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अर्थात मृतांचे हे आकडे सरकारी नोंदीनुसार आहेत, प्रत्यक्षात वस्तुस्थिती यापेक्षा खुप वेगळी आणि विदारक आहे.
1 मार्चनंतरच्या अडिच महिन्यात उसळलेल्या कोविडच्या दुसर्या संक्रमणाचा वेग प्रचंड असल्याचेही वेळोवेळी आम्ही आमच्या वृत्त विश्लेषणातून वाचकांसमोर मांडले आहे. गेल्या वर्षी एप्रिलपासून यावर्षी फेब्रुवारीपर्यंतच्या 11 महिन्यात तालुक्यात प्रति महिना 619 रुग्ण या गतीने 6 हजार 811 रुग्णांची भर पडली. तर मागील अवघ्या 73 दिवसांतच सरासरी तब्बल 4 हजार 580 रुग्ण (दररोज 157 रुग्ण) इतक्या प्रचंड गतीने तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 11 हजार 444 रुग्णांची भर पडून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 18 हजार 255 वर पोहोचली आहे. एकीकडे वाढलेले संक्रमण आणि मृत्यूचा टक्का तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असे विरोधाभासी चित्रही या दरम्यान बघायला मिळत आहे. कोविडच्या दुसर्या संक्रमणाचा वेग आणि त्यात मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्याचवेळी रुग्ण बरे होणार्यांची खालावलेली सरासरी गेल्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने उंचावत आजच्या स्थितीत थेट 90.94 टक्क्यांवर गेल्याने कोविडच्या भयातही संगमनेरकरांना दिलाशाची पालवी दिसत आहे.
अहमदनगर खालोखाल संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा वेग आणि बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील कोविड चाचण्यांचे प्रमाण अधिक असल्याने राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण समोर आले आहेत. संगमनेर तालुक्यातही आजवर 75 हजार 279 संशयितांच्या स्राव चाचण्या केल्या गेल्या, त्यातून 24.25 या सरासरीने आत्तापर्यंत 18 हजार 255 रुग्ण समोर आले. त्यातील 16 हजार 601 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले, 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर दुर्दैवाने शासकीय आकडेवारीनुसार आत्तापर्यंत शहरातील 22 जणांसह तालुक्यातील एकूण 95 जणांचा कोविडने बळीही घेतला आहे.