डोळासणे शिवारात ट्रॅक्टर व पिकअपचा भीषण अपघात! ट्रॅक्टरचालक जागीच ठार तर तीन विद्यार्थी जखमी; घारगाव पोलिसांचा कामचुकारपणाही उघड..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नूतनीकरणानंतरही प्रवाशांसाठी ‘मृत्युघंटा’च ठरत असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने आज आणखी एकाचा बळी घेतला. गुरुवारी (ता.13) सकाळी आठच्या सुमारास डोळासणे शिवारातील बांबलेवाडीजवळ घडलेल्या या भीषण अपघातात पुण्याहून नाशिकच्या दिशेने येणार्‍या रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत ट्रॅक्टरचे मधोमध दोन तुकडे होवून त्याखाली दाबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातात शाळेत जाणार्‍या एका विद्यार्थ्यासह दोन विद्यार्थीनीही जखमी झाले. त्यातील विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर पिकअपचालक वाहन सोडून पसार झाला. बांबलेवाडीचे ग्रामस्थ व महामार्ग पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करीत जखमींना संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

 
याबाबत समजलेल्या माहितीनुसार मुळचा जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथील रहिवासी असलेला संतोष नारायण शिंदे हा तरुण सकाळी आठच्या सुमारास आपला ट्रॅक्टर घेवून घारगावकडून संगमनेरकडे येत होता. त्याचे वाहन डोळासणे शिवारातील बांबलेवाडीनजीक आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील महिंद्र पिकअप वाहनाने (क्र.एम.एच.15/एच.एच.8529) पुढे चाललेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की धडक झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्टरचे मधेामध दोन भाग होवून त्याचा मोठा टायर ट्रॅक्टरपासून तुटून वेगळा झाला.
आणि उर्वरीत इंजिनसह राहीलेल्या अर्ध्याभागात दबल्याने ट्रॅक्टरचालक संतोष शिंदे हा जागीच ठार झाला. हा अपघात घडला त्यावेळी बांबलेवाडीतील अनुराग बाबाजी गोडे, अपेक्षा दत्तात्रय गोडे व राणी लहु लोहकरे हे तीन विद्यार्थी रस्त्याने पायी शाळेत चालले होते. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे काही अवशेष उडून इतरत्र पडल्याने त्यात हे तिघेही विद्यार्थी जखमी झाले. या अपघाताच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत गावकर्‍यांनी महामार्ग पोलिसांसह घारगाव पोलिसांनाही कळविले.


अपघाताची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांतच डोळासणे महामार्ग पोलीस घटनास्थळी हजर झाले व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य करीत जखमी झालेल्या तिघा विद्यार्थ्याना तत्काळ संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यातील अनुराग गोडे या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. तर, ट्रॅक्टरचालक अपघातग्रस्त वाहनाखाली दाबला गेल्याने टोल कंपनीकडून आलेल्या क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टरचे अवशेष उचलून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या अपघातानंतर सुमारे तासभर नाशिककडे जाणार्‍या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


मात्र डोळासणे महामार्ग पोलिसांनी एकीकडे मदतकार्य आणि दुसरीकडे वाहतूक सुरळीत केली. सर्वकाही उरकल्यानंतर घटनास्थळापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घारगाव पोलीस ठाण्यातील अवघा एक कर्मचारी घटनास्थळावर पोहोचला. त्यावरुन पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या कामचुकारपणाचा वारसा आजही विद्यमान पोलीस निरीक्षक संतोष खेडकर अतिशय इमानेइतबारे सांभाळीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही यावेळी समोर आल्या. या अपघातात दुर्दैवाने जीव गमावलेल्या संतोष शिंदे या ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात आणण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात येणार आहे.

सहा वर्षांपूर्वी नूतनीकरण झालेला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग टोलनाक्यासह जनसेवेत रुजू झाला. तेव्हापासून या रस्त्यावर पूर्वीप्रमाणेच नियमितपणे अपघात होत असून आजवर शेकडों निष्पापांचे बळी गेले आहेत, तर शेकडों नागरिकांना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. आजच्या अपघातानंतर टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनीही ट्रॅक्टरखाली दबलेल्या चालकाचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्यास नकार दिला होता, मात्र महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी त्या कर्मचार्‍यांना कायद्याच्या भाषेत सांगितल्यानंतर मयताचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *