धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ः डॉ. लहामटे अकोलेतील पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर दिले स्पष्टीकरण
नायक वृत्तसेवा, अकोले
मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणसंदर्भात समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरु आहेत. आता या धनगर आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणसंदर्भात भाष्य केलं असून, धनगर समाजाला आरक्षण द्या. परंतु ते स्वतंत्रपणे द्या असे म्हटले आहे.
अकोल्यात शासकीय विश्रामगृहावर सोमवारी (ता.४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संविधानात अनुसूचित जाती-जमातीसाठी दिलेले आरक्षण हे संवैधानिक असल्याने ते इतर बाकीच्या कोणाला देणे शक्य नाही. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये. मराठा आरक्षणाबाबत देखील त्यांनी भाष्य केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यांवर सरकारकडून सकारात्मक मार्ग काढून ते मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठ्यांना देण्यात येणारे आरक्षण हे हक्काचे व न्यायालयात टिकणारे मिळाले पाहिजे, यासाठी सरकारबरोबर मीही आग्रही असल्याचे आमदार लहामटे यावेळी म्हणाले.
याच पत्रकार परिषदेत त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला ३७ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमधे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोवत गेल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले. याचबरोबर मागील अधिवेशनात मी अकोले मतदारसंघात ३०० कोटींहून अधिकचा निधी आणला. आता नागपूरला २० डिसेंबरपर्यंत चालणार्या हिवाळी अधिवेशनात अकोल्यातील विकासकामांसाठी २५० ते ३०० कोटींचा निधी मिळेल. विकासाकामांसाठी व त्या निधीसाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलो असेही त्यांनी स्पष्ट केले.
अकोल्यातही एमआयडीसी होणार?
अकोले मतदारसंघात एमआयडीसीसाठी योग्य जागा उपलब्ध होत नसल्याने मुळा खोर्यातूनच साधारण ३०० एकर जागेवर छोटी एमआयडीसी निर्माण करण्याचे माझे प्रयत्न आहेत. जर उद्योजकांकडून प्रतिसाद व जागा उपलब्ध जर झाली तर अकोल्यात एमआयडीसी निर्माण करू असे आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले. म्हणजेच आता शिर्डी पाठोपाठ अकोल्यातही एमआयडीसी होणार का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.