‘नीट रहा, नाहीतर गोळ्या घालीन..!’ शेतकर्‍यांना धमकावण्याचे लोण आता थेट अकोल्यात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यांना कडाडून विरोध करणार्‍या आणि त्यासाठी थेट मुंबईतील राजभवन गाठणार्‍या शेतकरी नेत्यांनाही आता धमक्या देण्याचे सत्र सुरु झाले आहे. महाराष्ट्राच्या अलिकडच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच घडलेल्या या प्रकारातून मार्क्सवादी किसान सभेचे राज्यसचिव तथा शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांना ‘फेसबुक’ वरुन थेट गोळ्या घालण्याची तंबी देण्यात आली आहे, या प्रकरणी नवले अथवा त्यांच्या संघटनेकडून पोलिसांकडे अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र या प्रकारातून आंदोलकांना धमकावण्याचे लोण आता थेट अकोल्यात येवून पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.


गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्ली भोवतीच्या टिकरी, सिंघू आणि गाजीपूर सीमेवर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारों शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर केलेले तिनही कृषी कायदे मागे घ्यावेत या एकमुखी मागणीसाठी सुरु असलेल्या तेथील आंदोलनाच्या समर्थनार्थ मार्क्सवादी किसान सभेच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. त्यासाठी किसान सभेचे राज्य सचिव तथा शेतकरी नेते कॉ.डॉ.अजित नवले यांनी विविध आंदोलने पुकारली आहेत. त्याचाच भाग म्हणून 26 जानेवारी रोजी त्यांच्या नेतृत्त्वाखाली हजारों शेतकर्‍यांनी मुंबईतील राजभवन गाठून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्याचे नियोजन केले होते.


मात्र तत्पूर्वीच राज्यपाल गोवा विधानसभेच्या अधिवेशनासाठी निघून गेल्याने शेतकर्‍यांचा संताप झाला आणि त्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले. त्याचा परिपाक या आंदोलनाचे नेतृत्त्व करणार्‍या आणि केंद्र सरकारविरोधात रान उठवणार्‍या अकोल्यासारख्या दुर्गमभागातील शेतकरी नेत्याला धमकावण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता.28) एका व्यक्तिने समाज माध्यमावरील फेसबुक वरुन त्यांना धमकी देत ‘नीट रहा, नाहीतर गोळ्या घालीन!’ असा दम भरला आहे. अशा धमक्यांना भिक घालीन तो अमृतवाहिनीचे पाणीच प्याला नाही, असे म्हणत त्यांनी शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी सुरु असलेला लढा असाच सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


डॉ.नवले यांना देण्यात आलेल्या या धमकीची मार्क्सवादी किसान सभेने गंभीर दखल घेतली आहे. संघटनेचे ज्येष्ठनेते कॉ.नरसय्या आडम (मास्तर) यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवतांना ‘सध्या देशभर केंद्र सरकारविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु आहे. ते दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कृटील कारस्थानाचाच हा भाग आहे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हौतात्म्य दिवस आहे, त्यांचा खून करणार्‍या व्यक्तिच आज शेतकर्‍यांना धमकावत आहेत’ असा घणाघात करीत कॉ.नवले यांना धमकी देणार्‍या व त्यास लाईक करणार्‍यांविरोधात पोलीस कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.


धमकी देण्याचा हा प्रकार एका संघटनेच्या दोघांनी केल्याचा संशय व्यक्त करीत डॉ.नवले यांनी त्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करणार असल्याचे सांगीतले. त्या अनुषंगाने आज (ता.30) अकोल्यात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर पोलिसांना कारवाईबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

”कोणाच्या धमक्यांमुळे कधीही चळवळी थांबत नसतात. माणसं मारुन आजवर कधीही विचार संपलेले नाहीत. सरकारच्या समर्थकांनी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. दिल्लीत सुरु असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करु. त्यासाठी लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात रान पेटवणार आहोत.”
कॉ.डॉ.अजित नवले
राज्य सचिव : मार्क्सवादी किसान सभा

Visits: 16 Today: 1 Total: 118292

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *