श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात गतीरोधक बसवा! राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांची निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढून अनेकजण मृत्यूमूखी पडले आहेत. याठिकाणी तातडीने गतीरोधक बसवून सिग्नल उभारावेत व वाहतूक पोलीस नेमावेत अशी मागणी राहुरी फॅक्टरी परिसरातील सामाजिक संघटनांनी तहसीलदार चंद्रजीत रजपूत व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात म्हटले आहे, की राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावरील श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. येथे सातत्याने अपघात घडून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी चिंचविहिरे येथील योगेश पानसंबळ या तरुणाचा याच ठिकाणी ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. यापूर्वी शालेय विद्यार्थिनी व पालकास अपघातात जीव गमवावे लागले आहेत. तसेच अनेकजण येथे अपघातात जखमी झाले आहेत.
![]()
त्यामुळे श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात गतीरोधक बसवावेत. सिग्नल उभारावेत तसेच वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. अन्यथा राहुरी फॅक्टरी येथील सर्वपक्षीय संघटनाांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, साम्राज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत गव्हाणे, योगेश नालकर, माजी नगरसेवक प्रदीप गरड आदिंसह राहुरी फॅक्टरी, चिंचविहिरे येथील नागरिक उपस्थित होते.
