पर्यविक्षाधीन उपाधिक्षकांची दहशत ‘कायद्या’ची की ‘फायद्या’ची! तीन महिन्यांचा कार्यकाळ गाजला; आता चर्चा ‘विशेष पथका’च्या अस्तित्वाची..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी गेल्या महिनाभरात जिल्ह्यात एकामागून एक केलेल्या धडाकेबाज कारवाया चांगल्याच गाजल्या आहेत. कधीकाळी ‘एलसीबी’त कार्यरत राहीलेल्या आणि आपल्या वतनात वेगळाच ‘धाक’ निर्माण करणार्या एका कर्मचार्याच्या ‘नेटवर्क’चा आधार घेवून त्यांनी नेवासा, पाथर्डी पाठोपाठ संगमनेर, कोपरगाव, कोतुळसह जिल्ह्यात अर्धाडझन ‘धडक’ कारवाया करीत अवैध व्यावसायिकांवर चांगलीच ‘दहशत’ निर्माण केली आहे. जुगार, गुटखा, मटका, वाळू अशा कितीतरी उद्योगांना लक्ष्य करीत त्यांनी तेथील मूळातच हात घालीत गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला. आता त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर पोलीस अधिक्षकांनी स्थापन केलेल्या ‘विशेष पथका’चे भवितव्य काय? असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या बदलीनंतर या पथकाचे अस्तित्व राहणार की नेहमीप्रमाणे ‘एलसीबी’चे राज्य येणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातूनच प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधिक्षकांनी निर्माण केलेल्या दहशतीचा ‘कायद्या’साठी वापर होतो की, ‘फायद्या’साठी याबाबतची उत्सुकताही ताणली गेली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांची तीन महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी
जिल्ह्यात बदली झाली. एप्रिलमध्येच जिल्ह्यात दाखल झालेल्या खाडे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या कार्यकाळात नियमित वगळता फारकाही धडाकेबाज कृती केली नाही. मात्र त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्यात श्रीरामपूर विभागाच्या उपअधिक्षकपदाचा कार्यानुभव घेवून अधिक्षक झालेल्या सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेताच अवैध व्यवसाय व गुन्हेगारी प्रवृत्तींची गय केली जाणार नाही असे ठणकावत जिल्ह्यातील सर्व उपविभागांची ‘ऑनलाईन’ बैठक घेत त्यात ‘विशेष पथका’ची नेमणूक केली. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दित या पथकाकडून कारवाई होईल तेथील प्रभार्यांना शिस्तभंगाचा सामना करावा लागेल असेही त्यांनी बजावले. अर्थात गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दित अर्धाडझनहून अधिक कारवाया होवूनही अशाप्रकारची कारवाई झाल्याचे अद्याप ऐकिवात नाही.

जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आपली भूमिका किती कणखर आहे हे दाखवताना जिल्ह्याच्या नेवासा विभागात तीन महिन्यांसाठी दाखल झालेल्या उपाधिक्षक संतोष खाडे यांच्यावर भरवसा दाखवत त्यांच्या दिमतीला पूर्वी एलसीबीचा तगडा अनुभव, जबरदस्त नेटवर्क आणि गुन्हेगारांच्या पाळेमुळ्यासह वेगळी दहशत असलेला कर्मचारीही दिला. त्यामुळे या पथकाने जुगार, मटका, गुटखा, वाळू अशा दररोज कोट्यवधीची उलाढल होणार्या व्यवसायांना लक्ष करीत त्यांच्यावर धडाकेबाज कारवाया करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात सर्वत्र स्तोम माजलेल्या अवैध व्यवसायावर प्रातिनिधीक मात्र थेट मूळावरच कारवाईचा सपाटा सुरु झाल्याने त्या प्रकारच्या व्यवसायात असलेल्या जिल्ह्यातील अन्य लोकांचे धाबे दणाणले.

अगदी संगमनेर शहरातील मटक्याच्या पेढीवर छापे घालताना या पथकाने काही दशकानंतर पहिल्यांदाच शहरात पारपंरिक पद्धतीने मटका
चालवणार्या मूळ आरोपींना कायद्याच्या कक्षेत घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. जुगार व सर्वाधीक गुटख्याच्या बाबतही असाच प्रकार राबवला गेला. या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. गेल्या महिनाभरापासून एका पाठोपाठ सुरु असलेल्या या धडाकेबाज कारवायांनी जिल्ह्यातील बहुतेक अवैध व्यवसायांना चाप बसला असून असा व्यवसाय करणारे सध्या टाळे ठोकून अज्ञातवासात गेले आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायाही नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत असून जिल्ह्यात कायद्याचे राज्य असल्याचा भास निर्माण होत आहे.

मात्र त्याच कल्पित वातावरणात आता पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांचा जिल्ह्यातील प्रशिक्षणाचा कार्यकाळही संपुष्टात आला असून पुढील आठवड्यात 20 जुलैरोजी ते जिल्ह्यातून अन्यत्र बदलून जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर पोलीस अधिक्षकांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘विशेष पथका’चे काय?, हे पथक कायम राहणार असल्यास ‘एलसीबी’चे काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून ठराविक कालावधीसाठी जिल्ह्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करुन पोलीस अधिक्षकांनी गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांवर निर्माण केलेली दहशत ‘कायद्या’ची ठरणार की ‘फायद्या’ची याबाबतची उत्कंठा मात्र ताणली गेली आहे.

गेल्या दशकभरात जिल्ह्यात अवैध व्यवसायाचे स्तोम माजले असून त्यातून गुन्हेगारी घटनांचा आलेखही उंचावला आहे. अशास्थितीत पूर्वानुभवाची शिदोरी घेवून जिल्हा पोलीस अधिक्षकपदाची सूत्र स्वीकारणार्या सोमनाथ घार्गे यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत अवैध व्यवसायांबाबत कठोर भूमिका स्वीकारतांना ‘विशेष पथका’ची स्थापना करुन जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात कायद्याची दहशतही निर्माण केली आहे. त्यातून जिल्ह्यातील बहुतेक सर्वच ‘धंदे’ बंद असून अपवादात्मक ठिकाणी जीवावर खेळ सुरु आहे. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यात कायद्याचे राज्य भासू लागले असून ही स्थिती कायम राहणार की नेहमीप्रमाणे ‘वजन’ वाढवणारी ठरणार याबाबत मात्र साशंकता कायम आहे, त्याचे उत्तर आगामी काळातच मिळू शकते.

