नांदूर खंदरमाळचे आरोग्य उपकेंद्र सुरू करा ः सुपेकर
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथील गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले आरोग्य उपकेंद्र कोरोनाच्या काळात तरी सुरू करा, अशी मागणी माजी उपसरपंच गणेश सुपेकर यांनी केली आहे.
नांदूर खंदरमाळ गावांतर्गत मोठ्या संख्येने वाड्या-वस्त्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून गावात आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र या आरोग्य केंद्रात काम करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना इतर खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. या आरोग्य उपकेंद्राबाबत माजी उपसरपंच गणेश सुपेकर यांनी अनेकदा आवाज उठविला. पण याकडे संबंधित विभागाने लक्ष दिले नाही. सध्या कोरोनाचा काळ असून, शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू केले आहे. परंतु, या भागातील नागरिकांना लसीकरणासाठी घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागत आहे. त्यात अंतरही जास्त असल्याने आदिवासी बांधवांना ये-जा करण्यास गैरसोय होत आहे. अनेकांकडे मोबाईलही नसल्याने लसीकरणापासून वंचित राहत आहेत. यामुळे शासनाने नांदूर खंदरमाळ येथील बंद अवस्थेत असलेले आरोग्य उपकेंद्र कोरोनाच्या काळात तरी सुरू करून तेथे नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून या भागातील लोकांचे हाल होणार नाहीत. त्याचबरोबर लसीकरणासाठी आठवड्यातील एक वार दिला तरी नागरिकांना लस मिळेल अशी मागणी माजी उपसरपंच गणेश सुपेकर यांनी केली आहे.