विखेंच्या प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवाराची जोर्वेत पिस्तुलबाजी! आमदार थोरात यांच्यावरील सोशल टीकेची प्रतिक्रिया; पशुवैद्यकीय अधिकार्यांवर पिस्तुल ताणले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे माजी महसूलमंत्री, विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात करताना ‘सागर बंगल्यावर वॉशिंग मशिनचे काम सुरु असावे’ असा टीकात्मक उल्लेख केला होता. गुरुवारी दिवसभर त्यांचे हे वक्तव्य माध्यमांमध्ये धुमाकूळ घालीत असताना सोशल माध्यमातही त्यावरुन खुमासदार चर्चा रंगल्याचे दिसून आले. त्यातूनच एका राज्यस्तरीय वृत्तवाहिनीच्या सोशल माध्यमातील याच वृत्तावर पिंपरणे येथील पत्रकाराने प्रतिक्रिया दिल्याने त्याचे पडसाद जोर्वे येथील सुरेश थोरात यांच्यासह अन्य 50 ते 60 जणांनी त्या पत्रकाराच्या घरी जावून त्याच्या कुटुंबियांना धमक्या व दमबाजी करण्यातून उमटले. यावेळी सदर पत्रकाराच्या पशुवैद्यकीय अधिकारी असलेल्या भावावर पिस्तुल रोखले गेल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला असून याबाबत दाखल तक्रारीवरुन तालुका पोलिसांनी बेकायदा जमाव गोळा करुन दंगल घडवून आणणे, अनाधिकाराने घरात घुसून मारहाण करणे व बेकायदा पिस्तुल बाळगण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना गुरुवारी (ता.18) तालुक्यातील पिंपरणे येथे घडली. पेशाने पशुवैद्यकीय अधिकारी असलेले विवेक भास्कर चत्तर हे रात्री आसपासच्या पशुपालकांकडे जनावरांची नियमित तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरात त्यांच्या आई-वडीलांसह पत्नी, भावजयी व मुले होती. त्याचवेळी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या वडीलांचा फोन आला व त्यांनी घरात काही माणसं आली असून ती धमकावत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे, तू तत्काळ निघून ये असा निरोप दिल्याने पशुवैद्यकीय अधिकारी असलेले विवेक चत्तर तेथून थेट घरी परतले.

यावेळी त्यांच्या घरासमोर 50 ते 60 इसम हातात हातात लोखंडी रॉड, कोयते व कुर्हाडी घेवून घोळक्याने उभे असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे आश्चर्यचकीत होवून त्यांनी ‘तुम्ही येथे काय करताय?’ अशी विचारणा केली असता जमलेल्या जमावातील काहींनी त्यांना शिवीगाळ करीत दमबाजी करण्यास सुरुवात केली व काहीजण त्यांच्यावर धावून गेले. त्यामुळे घाबरलेले विवेक चत्तर घरात पळाले. त्यावेळी घरात पूर्वीपासूनच सुरेश जगन्नाथ थोरात (रा. जोर्वे) हे हातात पिस्तुल घेवून उभे असल्याचे व त्यांची आई आणि भावजयी त्यांचे हातापाया पडत रडत असल्याचे त्यांना दिसले.

त्याचवेळी योगेश शांताराम जोशी उर्फ पप्पू गुरुजी व भाऊसाहेब बाबुराव दिघे (दोघेही रा. जोर्वे) हे घरात घुसले व त्यांनी विवेक चत्तर यांना पकडले तर आधीच घरात असलेल्या सुरेश थोरात यांनी आपल्या जवळील पिस्तुल चत्तर यांच्या डोक्यावर ताणून ‘तुला व तुझा भाऊ स्वानंद चत्तर याला जीवे ठार मारील. तुझा तो पत्रकार भाऊ कोठे आहे? तो जरा जास्तच माजलाय. तुमच्या घरातील कोणीही जर जोर्वे गावात दिसला तर खांडोळ्या करुन नदीपात्रात फेकून देईल. आमच्या नादी लागाल तर कायमचा काटा काढून टाकू’ अशी धमकीही त्यांनी दिली. यावेळी सुनील जगन्नाथ थोरात आणि मुकेश विठ्ठल काकड यांनी घरात येवून तक्रारदार चत्तर यांची आई, डोळ्याने अंध असलेले वडील व भावजयी यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली व जाताना ‘मी तुझ्या भावाला गोळ्या घालून ठार मारील’ अशी धमकी देत ते सर्वजण तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरुन संगमनेर तालुका पोलिसांनी सुरेश जगन्नाथ थोरात, योगेश शांताराम जोशी उर्फ पप्पू गुरु, भाऊसाहेब बाबुराव दिघे, सुनील जगन्नाथ थोरात, मुकेश विठ्ठल काकड (सर्व रा. जोर्वे) यांच्यासह 50 ते 60 अज्ञात इसमांविरोधात भा.दं.वि. कलम 143, 147, 149, 452, 323, 504, 506 सह भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 3/25 नुसार गुन्हा दाखनल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजीत ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

बुधवारी (ता.17) रात्री फोन टॅपिंग प्रकरणी आरोप असलेल्या वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावर गुरुवारी पत्रकारांनी विचारले असता माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘सागर बंगल्यावर वॉशिंग मशिनचे काम सुरु असेल’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली. गुरुवारी आमदार थोरात विधीमंडळात बोलत असताना त्याचे थेट प्रसारण एका राज्यस्तरीय खासगी वृत्तवाहिनीवरुन दूरचित्रवाणी व सोशल माध्यमातील फेसबुकवर सुरु असताना पिंपरणे येथील पत्रकार स्वानंद चत्तर यांनी त्यावर कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवताना आमदार थोरात यांच्याबद्दल अवमानजनक शब्दांचा वापर केला होता. त्यावरुनच हा संपूर्ण प्रकार घडल्याचे आता समोर येत आहे. सुरेश थोरात यांना संगमनेरात लढवय्या कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. 2019 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघात तेथील विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसकडून त्यांनी निवडणूकही लढविली होती. त्या निवडणुकीच्या माध्यमातूनच ते संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. आता त्यांच्यावरच विविध गंभीर कलमांसह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

