कोविडने घेतला संगमनेर तालुक्यातील आणखी एकाचा बळी? मालदाड येथील होतकरु छायाचित्रकाराच्या मृत्युने पंचक्रोशीत पसरली शोककळा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविड प्रादुर्भावाची दाहकता दिवसांगणिक उग्ररुप धारण करीत आहे. गुरुवारी संगमनेर तालुक्यातील बाधितांचे अठरावे शतक पूर्ण होण्यासोबतच कोविडच्या संक्रमणातून अवघ्या 35 वर्षीय होतकरु तरुणाचा बळीही गेला. हा मृत्यु तालुक्यातील मालदाडसह संपूर्ण तालुक्याला वेदना देणारा ठरला. अतिशय खडतर परिश्रमातून छायाचित्रकार असलेल्या या तरुणाने आपले विश्‍व रचले होते, मात्र कोविडच्या विषाणूंची त्याला नजर लागली आणि त्याला अकाली या जगाचा निरोप घ्यावा लागला. दुर्दैव म्हणजे बुधवारीच त्याच्या 80 वर्षीय आजोबांचे निधन झाले होते, त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्याचाही मृत्यु झाल्याने मालदाड पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. या तरुणावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, तेथेच त्याचा मृत्यु झाला त्यामुळे त्याच्या मृत्युची नोंद अद्याप संगमनेरच्या कोविड मृत्युत करण्यात आलेली नाही.


गेल्या 20 ऑगस्टरोजी मालदाड येथील या 35 वर्षीय छायाचित्रकारासह त्याचे 80 वर्षीय आजोबा, 65 वर्षीय वडिल, नऊ वर्षीय मुलगा आणि 35 वर्षीय महिला संक्रमित असल्याचे समोर आले होते. आजोबा-आजी, आई-वडिल, छोटा भाऊ आणि भवजयी व पत्नी अणि दोन मुले असे हसतेखेळते कुटुंब असलेल्या परिवाराचा तो कर्ता पुरुष होता. कोविडच्या संक्रमणात त्याचे कुटुंबिय आजारी पडल्याने त्यांची काळजी वाहताना त्याचे स्वतःकडे दुर्लक्ष झाले आणि कोविडने आपले सावज हेरले.


सुरुवातीला त्यांच्यावर संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्या दरम्यान त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी उपचार पूर्ण करीत घर गाठले. मात्र सदर तरुणाची प्रकृती खालावतच गेल्याने अखेर त्यांना अत्यवस्थ अवस्थेत तीनच दिवसांपूर्वी नाशिकमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच गुरुवारी कोविडने त्यांचा बळी घेतला. दुर्दैव म्हणजे सदर तरुणासह त्याच्या कुटुंबातील बहुतेक सर्व सदस्य संक्रमित झाले होते, त्यात त्याचे 80 वर्षीय आजोबाही होते. सदरचा तरुण वगळता त्याच्या अन्य कुटुंबियांनी कोविडचा पराभव केला. ही सगळी मंडळी घरी परतल्यानंतर बुधवारी (ता.2) त्या 80 वर्षीय इसमाचा हृदयविकाराने मृत्यु झाला. तर त्याच्या दुसर्‍याच दिवशी सदर तरुणाने जगाचा निरोप घेतला. सलग दोन दिवसांत कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभच कोसळल्याने मालदाडमधील त्या कुटुंबावर तर आभाळच कोसळले आहे.


सदर 35 वर्षीय तरुण अत्यंत प्रामाणिक, मनमिळावू स्वभावाचा आणि अतिशय मेहनती होता. सुरुवातीला त्याने वेल्डिंग दुकानात काम केले होते. त्यानंतर त्याने रिक्षा चालवूनही आपल्या जीवन प्रवासाला गती देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याला छायाचित्रणाची आवड निर्माण झाल्याने 2003 पासून त्याने याच क्षेत्रात आपले भविष्य घडविण्यास सुरुवात केली आणि तो यशस्वीही झाला. गेल्या सतरा वर्षात त्याने मालदाडच्या पंचक्रोशीत स्वतःचे वलय निर्माण केले, त्यातूनच मालदाड आणि वर्षभरापूर्वी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेसमोर त्याने आपला स्वतंत्र स्टडिओही सुरु केला. त्याच्या व्यवसायाला प्रामाणिकतेची जोड असल्याने अनेक ग्राहक त्याच्या हक्काचे झाले होते. त्याच्या अकाली मृत्युने गेल्या सतरा वर्षात त्याच्या जवळ आलेल्यांसह संपूर्ण मालदाड आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

” गुरुवारी रात्री संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत 16 रुग्णांची भर पडण्यासोबतच तालुक्याच्या रुग्णसंख्येने अठरावे शतक ओलांडीत 1 हजार 815 रुग्णसंख्या गाठली. त्यानंतर काही वेळातच मालदाडमधील सदर तरुण छायाचित्रकाराच्या मृत्युची वार्ता येवून धडकल्याने अवघा तालुका शहारला. मालदाडमधील नागरिकांनी त्या तरुणाचा संघर्ष आणि त्याविरोधात त्याची लढाई बघितलेली असल्याने या वृत्ताने मालदाडकरांचे डोळे पाणावले. सलग दोन दिवसांत त्या कुटुंबातील दोघांचा मृत्यु झाल्याने संपूर्ण संगमनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 17 Today: 2 Total: 116625

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *