दिवसाढवळ्या घरात घुसून दागिन्यांची चोरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रात्रीच्या अंधारात चोर्‍या, दरोडे, घरफोड्या यासारख्या घटना नियमित असतानाच आता संगमनेरात चक्क दिवसाढवळ्या घरात घुसून चोर्‍या करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. असाच काहीसा प्रकार गुरुवारी भल्या सकाळीच शहरातील मालदाड रोडवर घडला असून घरात वयस्कर गृहस्थ एकटेच असल्याचे ताडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातील तब्बल 62 हजार 500 रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत. या घटनेने दिवसाही शहरातील नागरिकांचा ऐवज सुरक्षित नसल्याचे समोर आले असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना काल गुरुवारी (ता.23) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मालदाड रोडवरील सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. या वसाहतीत राहणारे अनिल शमुवेल सांगळे हे सेवानिवृत्त गृहस्थ घरात एकटेच असल्याचे व त्यांच्या जिन्याचा दरवाजा उघडाच असल्याचे हेरुन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला व त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेला 50 हजार रुपये सरकारी मूल्य असलेला दोन तोळे वजनाचा सुवर्णहार व 12 हजार 500 रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे टॉप्स असा एकूण 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला. दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने सांगळे यांच्यासह परिसरातील नागरिकही आश्चर्यचकीत झाले. यापूर्वी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना रात्रीच्या अंधारात घडत असताना आता चक्क दिवसा घरात घुसून घडू लागल्याने परिसरात चोरट्यांची दहशतही निर्माण झाली. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भा.दं.वि. कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Visits: 98 Today: 1 Total: 1108371

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *