अँकर फोटो तळेगाव तळेगाव दिघे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा उषा दिघे

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या तळेगाव दिघे ग्रामपंचायतीच्या सरपंचदाचा पदभार पुन्हा उषा रमेश दिघे यांनी स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्या नंतर सरपंच उषा दिघे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेण्यात आली.

तळेगाव दिघे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी उषा रमेश दिघे या निवडून आल्या होत्या. त्यानंतर वर्षभराच्या आत त्यांचे ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध ठरविल्याने त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र या प्रकरणी त्यांनी विभागीय महसूल आयुक्तांकडे अपील केले होते. तेथेही न्याय न मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. औरंगाबाद खंडपीठात उषा रमेश दिघे यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे त्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र वैध ठरविण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांना राजकीय वनवास भोगावा लागला. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे पत्र संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामविकास अधिकारी यांना दिले होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी ( दि. ६ ) उषा रमेश दिघे यांनी तळेगाव दिघे ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात सरपंच उषा दिघे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची मासिक बैठक पार पडली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर नवनाथ दिघे, बाळासाहेब साहेबराव दिघे, आबासाहेब तात्याबा भागवत, भाऊसाहेब बाळासाहेब दिघे, शोभा मनोहर कांदळकर, कुसुम बबन दिघे, दिपाली मीननाथ दिघे, दुर्गा राजेश दिघे, कुसुम प्रकाश दिघे, कोमल राहुल जगताप, सुरेखा सुभाष जगताप, मंदा रघुनाथ इल्हे, ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र ताजणे उपस्थित होते. पदभार स्वीकारल्या नंतर ग्रामस्थांतर्फे सरपंच उषा दिघे यांचा सत्कार करण्यात आला. पदाच्या माध्यमातून आपण ग्रामविकासाच्या कामाला प्राधान्य देवू, असे सरपंच उषा दिघे यांनी सांगितले.

Visits: 71 Today: 2 Total: 1108200
