व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड वाढविण्याची युवासेनेची मागणी
![]()
नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोविड परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यातच शिर्डी मतदारसंघात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असून आरोग्य सेवा तोकडी पडत आहे. त्यामुळे शिर्डी मतदारसंघातील सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा वाढवून द्यावा, अशी मागणी शिवसेनाप्रणित युवासेनेच्यावतीने युवासेनाप्रमुख व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे.

या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, शिर्डी मतदारसंघात आरोग्य सुविधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांचे हाल होत आहे. वाढती रुग्णसंख्या व वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय ठरत आहे. लस व रेमडेसिविरच्या कमी पुरवठ्यामुळे जनतेचे हाल होत आहे. पहिला डोस घेणार्यांची मुदत संपली असताना दुसरा डोस मिळत नाही. जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. त्यामुळे आपण याकडे लक्ष देऊन व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, लस व रेमडेसिविरचा पुरवठा वाढवावा अशी मागणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे.
