वारीमध्ये आरोग्य कर्मचार्‍याचा दारू पिऊन धिंगाणा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या रुग्णाला कर्तव्यावर असताना दारू पिऊन आलेल्या आरोग्य कर्मचार्‍याने शिवीगाळ करत दमदाटी केली. या मद्यपी कर्मचार्‍याला खुद्द पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगात दारूचा संचार असल्याने पोलिसांनाही या बहाद्दराने दाद दिली नाही. शेवटी पोलिसांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नेत या कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी (ता.5) सकाळी 10च्या सुमारास घडली. आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक संतोष म्हस्के असे या कर्मचार्‍याचे नाव आहे.

बुधवारी वारीतील भरत गंगाधर वाघ हे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. लसी संदर्भातील नोंदणीचे काम हे आरोग्यसेवक म्हस्के यांच्याकडे आहे. वाघ यांनी लसीसंदर्भात म्हस्के यांच्याकडे चौकशी केली. त्यावर म्हस्के यांनी वाघ यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर इतर ग्रामस्थांनी म्हस्के यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. दारू पिलेले अर्सल्याने त्यांचा धिंगाणा सुरूच होता. ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावर पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे आपल्या फौजफाट्यासह वारी केंद्रात दाखल झाले. त्यांच्यासह इतरही पोलीस कर्मचार्‍यांनी या मद्यपी आरोग्य कर्मचार्‍याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने काही एक ऐकले नाही. शेवटी या कर्मचार्‍याला कोपरगाव येथे नेवून त्याची आरोग्य तपासणी केली. त्यात कर्मचारी दारू प्यायलेला असल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी संतोष म्हस्के याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के हे करत आहे.

Visits: 53 Today: 2 Total: 435827

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *