समर्थ शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला श्रमदानातून रस्ता

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील राजुर येथील स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या मवेशी येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रम राबवत श्रमदानातून रस्ता तयार करत विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची अडचण दूर केली.

या विद्यालयात आठवी, नववी, दहावीचे वर्ग असून या विद्यालयात जाण्या येण्याचा जो रस्ता आहे, तो रस्ता अतिवृष्टीमुळे खराब झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेत जाता येता त्रास होऊ लागला. ही बाब विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजूषा काळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी क्रीडा शिक्षक मच्छिंद्र देशमुख यांना सांगितली. त्यानंतर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना घेत या रस्त्याची दगड, मुरूम टाकत, खड्डे बुजवत रस्ता येण्या जाण्यासाठी व्यवस्थित केला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकेत्तर कर्मचारी सातपुते, बांडे, स्थानिक ग्रामस्थ यांचेही सहकार्य मिळाले. संस्थेचे सचिव सचिव शांताराम काळे यांनी विद्यार्थी, शिक्षक ग्रामस्थांचे हा उपक्रम राबवल्याने कौतुक केले.

