मराठा आरक्षणाबाबत सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे ः पिचड सर्वच पक्षांच्या समित्यांनी तोडगा काढण्याचेही केले आवाहन
नायक वृत्तसेवा, अकोले
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने झिडकारले हे ऐकून धक्का बसला. राज्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. त्याबाबत व मराठा आरक्षणाबाबत विचार विनिमय करण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्याने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे. सर्वच पक्षांच्या समित्यांनी त्यावर तोडगा काढावा, असे प्रतिपादन माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केले आहे.
याविषयी बोलताना पिचड पुढे म्हणाले, बुधवारी (ता.5) मराठा आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने झिडकारले आहे. यामुळे मला धक्का बसला आहे. हा निकाल ऐकून अत्यंत वाईट वाटले आहे. मराठा समाजासाठी राणे समितीत मी स्वत: काम केलेला माणूस आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन मराठा समाजाचे अवलोकन करण्याचे भाग्य मला लाभले.
मराठा समाजातील सर्वचजण श्रीमंत नाहीत. मोलमजुरी करणे, मुंबईत माथाडी काम करणे, डोक्यावर ओझं उचलतात अशी कामे ते करीत आहेत. त्यांना मुंबईत स्वत:चे घर नाही. म्हणून मिळेल त्या झोपडीत राहतात. मी त्यांना झोपडीत राहताना स्वत: पहिले आहे. मराठा समाजातील अनेक कुटुंबांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ही अवस्था गायकवाड समितीने पाहिली आहे.
मराठा समजाला आरक्षण देण्याची भूमिका फडणवीस सरकारने घेतली होती. दुर्दैवाने मराठा समाजाच्या विरोधी निकाल गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने प्राधान्याने कोविडबाबत विचार विनिमय करणेबाबत व मराठा समाजाच्या आरक्षणसंबंधी विचार करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष आधिवेशन बोलवावे. सर्वच पक्षांच्या समितीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा असल्याचेही शेवटी त्यांनी नमूद केले.