हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती! पाबळ व नंदाळे पठार येथील दुष्काळाचे भयाण वास्तव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील वनकुटे गावांतर्गत असलेल्या पाबळ व नंदाळे पठार या दोन्ही आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई भासू लागली आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरुन खाली यावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र सध्या पहावयास मिळत आहे. यामुळे लवकरात लवकर टँकर सुरू करावा आणि महिलांची गैरसोय थांबवावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढण्याबरोबर पठारभागात भीषण पाणी टंचाई निर्माण होत आहे. वनकुटे गावापासून उंच डोंगरावर पाबळ व नंदाळे पठार या दोन आदिवासी वाड्या वसल्या आहेत. दोन्ही वाड्यांपासून एक ते दीड किलोमीटर अंतर डोंगराच्या पायथ्याशी विहीर आहे. मात्र सध्या वाड्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने येथील महिला, पुरुष, लहान मुले हंडे घेऊन पाणी आण्यासाठी डोंगर उतरुन खाली येतात. पुन्हा विहिरीतून पाणी ओढून हंडा भरायचा आणि डोक्यावर दोन ते तीन हंडे घेवून डोंगर चढायचा तेव्हा कुठेतरी पाणी मिळत आहे.
वर्षांनुवर्षांपासून अशा पद्धतीने आदिवासी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या वनकुटे गावठाण, नंदाळे पठार, पाबळ पठार, गांगड वस्ती आदी ठिकाणी भीषण पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हातान्हात महिला पाणी वाहून आणत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. दरम्यान, याबाबत ग्रामसेवक गोकुळ बळीद यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, टँकर सुरू करण्याची मागणी केल्यानंतर आम्ही प्रस्ताव तयार करून संगमनेर पंचायत समितीला सादर केला आहे. त्याचबरोबर भूजलचा दाखलाही दिला असल्याचेही सांगितले.