खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून रुग्णांची अडवणूक रुग्णांसह नातेवाईकांच्या अनेक तक्रारी; सहकार्याची अपेक्षा
नायक वृत्तसेवा, राहुरी
कोरोना संकटात रुग्णवाहिका, शववाहिका दिवस-रात्र धावत आहेत. रुग्णांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने सेवा बजावत आहेत. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकाचालक देवदूत भासत आहेत. मात्र, अपवादात्मक काही खासगी रुग्णवाहिकाचालक अडवणूक करून अतिरिक्त शुल्क आकारून अडवून करतात. सामान्य, गरीब रुग्णांचे नातेवाईकांकडून तशा तक्रारी होऊ लागल्या आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही, असे कुटुंब नशीबवान समजले जात आहे. घरोघरी कोरोनाबाधित झाले. अवाढव्य वैद्यकीय खर्चाच्या भीतीपोटी गरीब अनेक रुग्ण तपासणीकडे पाठ फिरवून घरगुती उपाय करतात. त्रास वाढल्यावर रुग्णालय, ऑक्सिजन बेड, रुग्णवाहिकांची शोधाशोध सुरू होते. या परिस्थितीचा काही खासगी रुग्णवाहिकाचालक गैरफायदा घेऊ लागले आहेत.
देवळाली प्रवरा येथे दोन दिवसांपूर्वी गरीब कुटुंबातील एका कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. ऑक्सिजन पातळी 65, एचआरसीटी स्कोअर 23 झाला. औरंगाबाद येथे एका रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाले; परंतु रुग्णाला हलवायला रुग्णवाहिका मिळेना. राहुरीतील खासगी रुग्णवाहिका बोलाविली. चालकाने रुग्णालयात पोहोचल्यावर शंभर किलोमीटरचे चौदा हजार रुपये भाडे मागितले. अगोदर भाडे, नंतर रुग्णाला उतरून देऊ, असा पवित्रा घेतला. रुग्णाचे आई-वडील हतबल झाले. दहा हजार रुपयांवर तडजोड झाली. बिल नाही, शासकीय दर माहिती नाही. मानसिक तणावाखाली लुबाडणूक होत आहे.